BREAKING NEWS
latest

महापालिकेच्या भरारी पथकाने कल्याण मध्ये केले दोन टन प्लॅस्टिक जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  पर्यावरणाचे रक्षण व्हावे याकरीता एकल वापर प्लॅस्टिकवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही अनेक व्यापारी आणि दुकानदार या प्लास्टिकचा सर्रास वापर करत असताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या भरारी पथकाकडून दोन टन प्लॅस्टिक वाहून नेणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

  कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरात गस्त सुरू असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ब' प्रभाग क्षेत्र परिसरातून केडीएमसीचे भरारी पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा टेम्पो पकडला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास महानगरपालिकेच्या भरारी पथकाची कल्याण पश्चिमेकडे खडकपाडा परिसरात गस्त सुरू होती. त्याचवेळी तिथे एक संशयित टेम्पो या पथकाच्या नजरेस पडला. टेम्पो थांबवून पथकाने झडती घेतली असता त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या असलेल्या तब्बल ३५ गोण्या असे  एकूण दोन टन एकल प्लास्टिक सापडले.

प्लॅस्टिक कुठून आणि कुणाला विक्री करण्यासाठी आणले होते याचा भरारी पथकाकडून शोध सुरू

  केडीएमसीच्या भरारी पथकाने हा टेम्पो ताब्यात घेऊन कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. सध्या या प्लास्टीकची तपासणी करून हे प्रतिबंधित प्लास्टिक आहे का ? यासंदर्भात माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतली जात आहे. तर टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्लॅस्टिक कुठून आणि कुणाला विक्री करण्यासाठी आणले होते याचा शोध घेतला जात आहे.

संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार
  दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक नेमके आले कुठून याचा शोध घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत