BREAKING NEWS
latest

शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरु केली तर लोकमान्य टिळकांनी ती फुलवून मोठी केली ! - प्राध्यापक हरी नरके

 


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  शिवचरित्र आपल्याला प्रेरणादायी आहे. परंतु काही लोक शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीनुसार सांगतात काही गोष्टी दडवून ठेवल्या जातात. भावनिक अंगाने महाराजांचा इतिहास सांगितला जातो. महाराजांना हे संकुचित करण्याचे काम आहे. शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांनी ती मोठी केली. याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत. असे प्राध्यापक हरी नरके यांनी महाविकास आघाडी संयोजित व्याख्यानाच्या डोंबिवली येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात सांगितले. 

  शिवजागर प्रतिष्ठानच्या  आणि संयोजक महाविकास आघाडी यांनी प्राध्यापक हरी नरके यांचे छत्रपती शिवाजी महाराज कुशल प्रशासक - संघटक या विषयावर सर्वेश हॉल येथे व्याख्यान ठेवले होते. त्या व्याख्यानात प्राध्यापक हरी नरके बोलत होते. तर संत तुकाराम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामींकडे जाण्याचा सल्ला दिला नसावा. कारण संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांचा काळ जुळत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात येऊन पुराव्यासकट इतिहास मांडल्याने आता डोंबिवलीतील वातावरण तापणार असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याचे चर्चा सुरू आहे. 

  आपल्या व्याख्यानात प्राध्यापक नरके असे म्हणाले कि, शिवाजी महाराजांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे असावे की जे शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देत होते. आता ५५% लोक शेती करत असताना शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करते. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते. लोक कल्याणासाठी हे धोरण सरकारने राबवले पाहिजे. इतिहास काल्पनिक रित्या सांगितला जातो. त्यासाठी पुरावे मागितले पाहिजे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी माणूस, महात्मा फुले, सावित्रीबाई, यांच्यावर गंभीर टीका केली होती. अशा माणसाला आता हाकलले आहे. यापूर्वीच खरंतर हे पार्सल महाराष्ट्र बाहेर पाठवायला हवे होते. आताची तरुण मंडळी शहाणे सुरती झाली आहे. त्यामुळे ते खोटा इतिहास स्वीकारणार नाहीत. 


  न.ची. केळकर यांच्या टिळक चरित्रात महात्मा फुले यांचा प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी ब्रिटिश पोलीसांनी मुंबई गव्हर्नरला  पाठविलेल्या पोलीस अहवालात फुलेंच्या पुण्यातील हिराबाग शिवजयंतीच्या सभेचा उल्लेख आहे. मुंबईच्या एलफिस्टन कॉलेजमधील आर्काइव्हज मध्ये याबाबत कागदपत्रे उपलब्ध आहेत. मुंबईतील लालबाग, परळ या कामगार वस्तीत केळुस्कर गुरुजीं नारायण मेघाजी लोखंडे, राव बहादूर वडणेकर, बाबासाहेब बोले यांनी  शिवजयंती साजरी केली होती. धनगर, भंडारी, कोळी, आगरी, मराठी, कुणबी यांनी जयंती साजरी केली होती. परंतु हे सगळं झाकायचं काम  करण्यात आलेले आहे.  याबाबतच्या बातम्या दीनबंधू मध्ये आलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास संशोधन विभागांमध्ये याबाबत संशोधन झाले असून, त्याबाबतची कागदपत्र उपलब्ध आहेत. मला टिळकांबद्दल खूप आदर आहे परंतु शिवजयंती टिळकांनी सुरू केली नसून, ती मोठी केली. शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली आहे. रामदास स्वामी विवाह समयी निघून गेले. आता लग्नानंतर लोक निघून जातात. असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता लगावला.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत