BREAKING NEWS
latest

कोरोना काळात पॅरोलवर सुटलेले ३५० कैदी परतलेच नाही..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  कोविड-१९ च्या महामारीच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ४२५३ कैद्यांना पॅरोलवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु कैद्यांना जेव्हा परत बोलावण्यात आलं तेव्हा सुमारे ४०० कैदी परतले नाहीत. आतापर्यंत १८ कैद्यांना मुंबई पोलिसांनी पकडून पुन्हा कारागृहात डांबलं आहे.

  मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, कोविडमधील गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. जेव्हा कोविड संपला तेव्हा त्यांना परत तुरुंगात रिपोर्ट करायचा होता, परंतु ते पुन्हा आलेच नाहीत. चौधरी म्हणाले की, आम्ही संपूर्ण यादी घेतली असून त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांना काम देण्यात आले आहे. आतापर्यंत आम्ही १८ जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे. काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

  मुंबई आणि महाराष्ट्रातील २० तुरुंगांमध्ये ३५,००० हून अधिक कैदी आहेत, जे तुरुंगांच्या निश्चित क्षमतेपेक्षा जास्त आहेत. वाढत्या संसर्गाचा धोका बघून २०२० मध्ये महाराष्ट्रातील कारागृहातून ४२५३ कैद्यांना गर्दी कमी करण्यासाठी तात्पुरता घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र कोविड संपल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याची वेळ आली, तेव्हा सुमारे ४०० जण भूमिगत झाले आहेत. मुंबई कारागृहातून ७२ कैद्यांची सुटका झाली होती. त्यातील काही तुरुंगात परतले तर काही जण अज्ञातवासात गेले. त्यामुळे आता त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्यासाठी पोलीसांना विशेष मोहीम राबवावी लागत आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत