BREAKING NEWS
latest

'मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा'


  प्रतिनिधी: अवधूत सावंत

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या  ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या.  मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले. 

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो, डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा - 

वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती सापडली, त्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या-पताका घेऊन येथे येत असतात. मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी - 

प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर  सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखे, गुरुवर्य नारायणदादा घाडगे, गुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत.  सन १९१५ च्या काळात हभप रामकृष्ण भावे महाराज मुंबईत  'जगाच्या कल्याणा' या ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, हाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे 'जग लावावे सत्पथी' हेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केली, आमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य हभप नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू हभप श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य हभप रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली हभप कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा - 

सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'संत मुक्ताबाई  पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह' साजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे 'आळंदी ते पंढरपूर' अशी पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहे, बरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ -

वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै हभप निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा हभप राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै हभप मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, वि.स.पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहे, गिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत. रजनीकांत दीक्षित, मनोहर राणे, ललन गोपाळ शर्मा, दत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल -

येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे ज्ञानेश्वर मोरे माऊली हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु  ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर हभप कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सध्या गुरुवर्य अनंत दादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य  म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. 

वरळी कोळीवाडा -

श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. १९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकर, नारायणदादा घाडगे, प्रमोद महाराज जगताप, केशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन -

शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणली, परंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होती, त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला.  प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम -

माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर.  १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे -

बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा -

भायखळा पश्चिमेला ना.म.जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजन, पोथीवाचन, आरती, हरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर -

जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन, पोथी वाचन, एकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य हभप गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूर, आळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकी, एल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम -

डी.एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर, गुंडामहाराज, तात्यासाहेब वास्कर, शंकरमहाराज कंधारकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, अमृतमहाराज नरखेडकर, बन्सीमहाराज तांबे, भानुदास महाराज देगलूरकर, किसनमहाराज साखरे, अर्जुनमामा साळुंखे, किसनदादा निगडीकर, मारुतीबाबा कुर्हेकर, जगन्नाथ महाराज पवार, रामदासबुवा मनसुख, हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, माधवराव शास्त्री, गोपाळबुवा रिसबूड, भीमसिंग महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, ज्ञानेश्वर महाराज मोरे, महंत प्रमोद महाराज जगताप, रविदास महाराज शिरसाट, एकनाथमहाराज सदगीर, केशव महाराज उखळीकर, संदीपान महाराज शिंदे, बंडातात्या कराडकर, पांडुरंगबुवा घुले, बळवंत महाराज औटी, न्यायमूर्ती मदन गोसावी, अशोक महाराज सूर्यवंशी, बोडके बुवा, आनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.


गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचा, कष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरे, हातिस्कर बुवा, वासुदेव (स्नेहल) भाटकर, शिवरामबुवा वरळीकर, मारुतीबुवा बागडे, खाशाबा कोकाटे, हरिभाऊ रिंगे, खाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडे, तुळशीरामबुवा दीक्षित, हरिबुवा रिंगे, किशनबुवा मुंगसे, भगवानबुवा निगडीकर, दामू अण्णा माळी, पांडुरंगबुवा रावडे, विठोबाबापू घाडगे, बाबुबुवा कळंबे, चंद्रकांत पांचाळ, विलासबुवा पाटील, परशुरामबुवा पांचाळ, रामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्री, गोविंदराव नलावडे, तुकाराम शेट्ये, मल्हारीबुवा भोईटे, सत्यवान माने, गणपतबुवा लेकावले, शंकर मेस्त्री, भाऊ पार्टे, विठोबा अण्णा घाडगे, राम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.  

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे  'वारकरी प्रबोधन महासमितीचे' संस्थापक अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल काय? किंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

संकलन - 
रवींद्र मालुसरे
(अध्यक्ष)
मराठी वृत्तपत्र लेखक संघ ,मुंबई 
भ्रमणध्वनी: ९३२३११७७०४


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत