BREAKING NEWS
latest

जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षणासाठी 'मिशन लाईफ' ची प्रतिज्ञा..

 


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  जागतिक पर्यावरण दिनी शहाड येथील ग्रासिम इंडस्ट्री (सेंचुरी रेयाॅन) येथे पर्यावरण रक्षणासाठी 'मिशन लाइफ' ची प्रतिज्ञा हजारो कर्मचाऱ्यांनी आणि विविध औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. औद्योगिक संघटना कामा, आमा, ग्रासिम इंड, सिईटिपी बदलापूर आणि कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ५ जून रोजी पर्यावरण संरक्षण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण जनजागृतीसाठी 'मिशन लाईफ' ही शपथ घेण्यात आली.

   'मिशन लाईफ' कार्यक्रमासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे येथील विभागीय संचालक भरत शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी उमेश तायडे  तसेच कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लिंबाजी भड, कामा संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी , पुणे प्रदूषण मंडळाचे प्रतीक भरणे, त्याचप्रमाणे औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी दिग्विजय पांडे, प्रकाश भट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.   उपस्थितांना मार्गदर्शन करताना भरत शर्मा म्हणाले की आपण  ३३% शिजवलेले अन्न फेकून देतो. या अन्नासाठी ज्वलनशील उर्जा, पाणी आणि खतांची गरज असते. ते देखील आपण वाया घालवतो. आपल्याकडे अजूनही पाणी मुबलक प्रमाणात नाही. त्यामुळे असे वाया जाणारे  शिजवलेलं अन्न फेकून देणे हे आपल्याला परवडण्यासारखे नाही. कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि पर्यावरणाचा नाश  होत आहे. ग्लासगो येथे झालेल्या पर्यावरण परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन लाईफ' चा अर्थ सांगितला आहे. अन्नाची मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ आपल्या वैयक्तिक योगदानातून योग्य पातळीवर आणावा, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. पर्यावरण रक्षणासाठी वैयक्तिक रित्या सुमारे ७५ बाबी अशा आहेत की, त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून करू शकतो. भावी पिढीला पृथ्वीमाता सोपवताना ती प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणाचा समतोल साधणारी  असेल. यासाठी व्यक्तिगतरीत्या आपण आपले योगदान दिले पाहिजे. हा संदेश आपल्या शेजाऱ्यांना व आसपासच्या व्यक्तींना द्यावा. असे आवाहन आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी उपस्थितांना करीत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आज आपण 'मिशन लाईफ'ची प्रतिज्ञा घेत असून पर्यावरण युक्त जीवनशैली कडे आपण प्रवास सुरू करीत आहोत.

उमेश  तायडे म्हणाले कोकणात पर्यावरण राखले गेले आहे. उल्हास नदी उगमापासून स्वच्छ झाली पाहिजे. लिंबाजी भड म्हणाले, लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण केले पाहिजे. प्रत्येकी वेतनातील एक टक्का रक्कम पर्यावरण संरक्षणासाठी खर्च करायला हवी. 'कामा' संघटनेचे कार्याध्यक्ष देवेन सोनी यांनी सिंगल युज प्लास्टिक म्हणजे एकल वापर प्लास्टिक  बाबत कडक कारवाई झाली पाहिजे असे आवाहन केले. बदलापूर  सीईटीपी चे सुमित जैन यांनी बदलापूर येथील संघटनेच्या वतीने चालविण्यात येणारे उदंचन केंद्र सक्षमपणे सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश भट यांनी उपस्थितांचे तसेच ग्रासिम कंपनीचे आभार मानले.« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत