BREAKING NEWS
latest

"केडीएमसी भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच रस्त्यात खड्डा" ; खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभार व चुकीच्या नियोजनामुळे महापालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे मलंग रोडवर एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालिकेतील हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली  महानगरपालिका 'भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणूनच रस्त्यात खड्डा' असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

आम आदमी पार्टी, कल्याण डोंबिवली शहराच्या वतीने कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे ट्राफिक पोलिसांच्या चौकी समोर रस्त्यांमध्ये उभे राहून कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळेस कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष ऍड. धनंजय जोग, राजेश शेलार, राजू पांडे, रवींद्र जाधव, अविनाश चौधरी, नीलम व्यवहारे, लक्ष्मी देशनहारे, इर्शाद शेख, मनोज कुमार, सिद्धांत गायकवाड, संतोष केदारे, सतीश तांबे, विनोद सुर्वे, आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

नुकतेच मागच्या आठवडयात मलंगगड रोडवरील द्वारली गावा जवळ एका युवकाचा खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना होऊन जीव गेला. मागील दोन तीन वर्षांपूर्वी असेच खड्ड्यांमुळे पाच कल्याणकर नागरिकांचा जीव गेला. तरी देखील महानगरपालिकेचे प्रशासन व त्यातील अधिकारी याना जाग येत नाही. कुंभकर्णाच्या गाढ झोपेत मस्तवालपणे नागरिकांच्या कर रुपी जमा होणाऱ्या पैशांत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप यावेळी ऍड. जोगदंड यांनी केला. 

खड्ड्यांमुळे शहरातील लहान मुलांना, महिलांना, वयोवृद्ध नागरिकांना, वाहन चालकांना, रिक्षा चालकांना, दुचाकी स्वारांना, तसेच ट्राफिक पोलिसांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत