BREAKING NEWS
latest

राजकीय घडामोडींना वेग येत शरद पवार यांचे येवल्यात आणि छगन भुजबळांचे नाशिक येथे आज शक्तीप्रदर्शन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये शरद पवार यांची आज सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होत आहे. तर, छगन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये आगमन होत आहे. दुपारी २ वाजता भुजबळ हे नाशिक येथे येणार आहे. त्यांच्या समर्थकांनी स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. तर पवार समर्थक येवल्यात धडकले असून  त्यामुळे आजच्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज ८ जुलैला नाशिकच्या येवला येथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार आहेत. बंडखोरी करुन मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ आहे. पवार हे भुजबळांच्या मतदारसंघातून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. त्यामुळे ते तेथे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून या वडीलरुपी नेत्याने महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार शनिवार दिनांक ८ जुलै रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या त्यांच्या  निवासस्थानावरुन शरद पवार हे निघतील. शरद पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर, इगतपुरी यामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.

भुजबळही आज नाशिकात

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच छगन भुजबळ हे नाशिकला येत आहेत. शनिवारी दुपारी २ वाजता त्यांचे पाथर्डी फाटा येथे स्वागत केले जाणार आहे. म्हणजेच शरद पवार हे येवला मतदारसंघात असताना भुजबळांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक येथे  बॅनरबाजीलाही उधाण आले आहे.

पवार समर्थक येवल्यात

आमदार रोहित पवार यांच्यासह शरद पवार समर्थक येवल्यामध्ये दाखल झाले आहेत. बाजार समितीच्या मैदानावर ही सभा होणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोशल मिडियात या सभेसाठी अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

पवार काय बोलणार ?

पक्षात बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच जाहीर सभा होत आहे. शिवाय पवार यांनी पहिले टार्गेट भुजबळ यांना केले आहे. भुजबळांच्याच येवला मतदारसंघात पवार हे काय बोलणार, भुजबळांवर काय आरोप करणार की काही महत्त्वाचे गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत