BREAKING NEWS
latest

उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत उपनेत्या नीलम गोऱ्हे शिंदे गटात सामील..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. सत्ताधारी सरकारमधील शिंदे गट अस्वस्थ असल्याच्या वार्ता येत असतानाही ठाकरे यांचे विश्वासू नीलम गोऱ्हे शिंदे गटात दाखल होत आहेत. त्यातच गोऱ्हे यांची सोडचिठ्ठी ही ठाकरे गटाची मोठी हानी करणारी असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

विधान परिषदेतल्या ठाकरे गटाच्या ११ आमदारांपैकी पैकी विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदें हे अगोदरच शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील ३ आमदार ठाकरे गटातून शिंदे गटात आले आहेत.

गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा ओघ कमी होत नाही. त्यामुळे विश्वासू नेते व कार्यकर्तेही आता शिंदे गटात सामील होत आहे. नीलम गोऱ्हे या गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडत होत्या. त्यांना शिवसेनेने उपसभापतीची संधी दिली. इतकेच नाही तर त्या उपनेत्या सुध्दा होत्या. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जातो.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदें यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. आता नीलम गोऱ्हे  यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्याबरोबरच माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश केला.

प्रवेश करताच त्या म्हणाल्या..

उभाठा सेनेच्या उपनेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे या प्रवेश करताच प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाल्या “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न हिरीरीने सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेवून मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत