BREAKING NEWS
latest

चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वी करत ‘विक्रम’ लँडर' झाले वेगळे..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
 इसरोने चांद्रयान-३ मोहिमेबद्दलची एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चांद्रयानमधील विक्रम लँडर प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे. गेल्या १ महिना ३ दिवसांपासून प्रॉपल्शन मॉड्यूलच्या पाठीवर विक्रम लँडर होता. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते, त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. आज चांद्रयान मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. आता विक्रम लँडर चंद्रावर लँड होण्यासाठी एकटेच प्रवास करेल. भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह 'विक्रम साराभाई' यांच्या नावाने लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. साराभाई यांना आज गर्व होत असेल. प्रॉपल्शन मॉड्यूलने लँडर विक्रमला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवले. प्रॉपल्शन मॉड्यूलपासून विक्रम लँडर वेगळे झाले त्यानंतर इसरोने ट्विट करून ही माहिती दिली. 'इसरो'ने लँडर विक्रमकडून प्रॉपल्शन मॉड्यूलचे आभार व्यक्त केले. इस्त्रोने ‘Thanks for the ride, mate !' असे ट्विट केले.

भारताच्या या मोहिमेवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. 'चांद्रयान-२' मोहिमेत इसरोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इसरोने २००८ साली 'चांद्रयान-१' मोहिम सुरु केली होती. गेल्या पंधरा वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे. आता सर्व भारतीयांना प्रतिक्षा आहे ती २३ आणि २४ ऑगस्टची. या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग होणे अपेक्षित आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत