BREAKING NEWS
latest

शरद पवारांच्या नव्या डावपेचामुळे अजित पवार गटापुढे मोठे संकट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्याने दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोप होत आहेत. पण त्याचवेळी आमच्यात फुट पडलेली नाही, असा दावा शरद पवार यांनी केला होता. पण आता शरद पवार गटाकडून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कोंडी करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे.

शरद पवार यांनी या बंडाला जनतेच्या न्यायालयात घेऊन जाणार, असे म्हटले होते. पण आता प्रत्यक्षात त्यांच्याकडून सुरू असलेल्या हालचाली या कायदेशीर कारवाईच्या दिशेचे संकेत देत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सातत्याने होत असलेल्या भेटी, त्यानंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून कुटुंब एक असल्याचा होत असलेला दावा यामुळे अनेक वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. त्यातही शरद पवार लवकरच भाजपसोबत असल्याची घोषणा करणार असल्याचेही बोलले जात होते. पण आता शरद पवार गट अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी सज्ज असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. त्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. निवडणुक आयोगाला पक्षात फुट पडल्याची कबुली दिल्यानंतर शरद पवार गटाने ही तयारी केली आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासूनच भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले.

आमदारकी रद्द होणार ?

अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि इतर ३१ आमदार अशा एकूण ४० जणांवर आमदारकी रद्द होण्याचे संकट उभं ठाकलं आहे. शरद पवार गटाने याचिका दाखल केल्यास या ४० जणांच्या आमदारकीला आव्हान मिळू शकते. पण हे सारे पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत लांबले जाणार, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत