हिंडेनबर्ग अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी उद्योग समूहाला महावितरणच्या कंत्राटामुळे ऊर्जा मिळणार आहे. राज्यात 'स्मार्ट वीज मीटर' बसविण्यासाठी महावितरणने २७ हजार कोटी रुपयांचे कंत्राट काढले आहे. त्यातील १३ हजार ८८८ कोटी रुपयांचे कंत्राट अदानी समूहाला देण्यात आले आहे. या कंपनीकडे पुणे, बारामती, भांडूप, कल्याण आणि कोकण या महावितरणच्या परिमंडलातील स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम दिले आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण) ने राज्यातील स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिलेल्या कंपन्यांची माहिती गुरुवारी दि.२१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली. या आदेशानुसार अदानी, एन.सी.सी., माँटेकार्लो आणि मेसर्स जीनस या कंपन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे २७ हजार कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यातील जवळपास निम्म्या रकमेचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. त्यानुसार भांडूप, कल्याण आणि कोकण या परिमंडलात ६३ लाख ४४ हजार ६६ वीज मीटर बसविण्यात येणार असून त्यासाठी ७ हजार ५९४ कोटी ४५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. बारामती आणि पुणे परिमंडलात ५२ लाख ४५ हजार ९१७ वीज मीटर बसविण्यात येतील त्यासाठी ६ हजार २९४ कोटी २८ लाख रूपये खर्च येणार आहे. एन.सी.सी. कंपनीकडे नाशिक, जळगाव, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद या परिमंडलाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक आणि जळगाव या परिमंडलात २८ लाख ८६ हजार ६२२ वीज मीटर बसविण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार ४६१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडलात २७ लाख ७७ हजार ७५९ वीज मीटर बसविण्यात येणार आहेत.
माँन्टेकार्लो या कंपनीला चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या परिमडलांत ३० लाख ३० हजार ३४६ वीज मीटर बसविण्याचे कंत्राट दिले आहे. या कामासाठी ३ हजार ६३५ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे. तर जीनस कंपनीकडे अकोला आणि अमरावती परिमंडलात २१ लाख ७६ हजार ६३६ वीज मीटर बसविण्याचे कंत्राट दिले असून त्यासाठी २ हजार ६०७ कोटी ६१ लाख रुपये खर्च येणार आहे.
प्रथमच एवढे मोठे कंत्राट
महावितरणच्या सर्वच परिमंडलात २ कोटी २४ लाख ६१ हजार ३४६ स्मार्ट मीटर बसविणार आहेत. त्यासाठी ५ हजार कोटी ६९ लाख रुपये खर्च येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी कंत्राट दिलेले आहे.
एका मीटरची किंमत बारा हजार रुपये आहे. ग्रामीण भागात बारा हजार रुपये ग्राहक लाईट बिलापोटी कित्येक वर्षात भरत नाहीत. त्यांचा मीटर नादुरुस्त झाला किंवा जळाला तर काय होईल ? त्या ग्राहकांना कोणता मीटर देणार याबाबत स्पष्टता नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा