सत्तासंघर्षाच्या गोंधळात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चांगलाच रंगून चर्चेत आहे. अशात वकील असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्ष एका विशिष्ट्य गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत, असे म्हटले आहे. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. कारण, त्यांना संविधान मानायचे नाही. पळून गेलेल्या आमदारांना लोकांनी मनातून अपात्र केले आहे. त्यामुळे आमदारांना निवडणूक अत्यंत कठीण जाणार आहे. पैशांचा खेळ जास्त दिवस चालणार नाही. हे भारतीय लोकशाही दाखवून देईल, असेही ऍड.असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपत्रातेबाबत कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. पण, अपात्रतेबाबत कारवाई करण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेणार. त्यासाठी कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. यावर वकील असीम सरोदे यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे.
राहुल नार्वेकर यांनी या एकूणच प्रकरणाबाबत महत्त्वाचे विधान केले होते. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखला जाईल. पण, कोणत्याही प्रकारची घाई अपत्रातेबाबतच्या निर्णयासाठी करणार नाही. घटनात्मक तरतुदी आणि विधानसभा अपात्रतेच्या नियमांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेऊ. याने कुणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. मी घेतलेला निर्णय नियमबाह्य आणि घटनाबाह्य नसेल. संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार असणार आहे. त्यासाठी लागेल तेवढा वेळ मी घेणार आहे. कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही", असे विधान राहुल नार्वेकर यांनी केले होते.
नार्वेकरांना हे माहिती आहे
संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा घालू शकत नाही. विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. याचा गैरफायदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेत आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्याला आदेश देऊ शकत नाही, हे नार्वेकरांना माहिती आहे, असे ऍड. असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा