संपूर्ण कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग आणि राज्यभरात आज गौरी गणपतीचे विसर्जन थाटामध्ये संपन्न झाले. हे रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या विसर्जनाला सुरुवात सायंकाळी चार वाजल्यानंतर सुरू झाली. गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तर गौरीचे प्रतीकात्मक स्वरूपात विसर्जन केले जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी कळशी मधून आणलेल्या तेरडा, तुळस, कुर्डू, हळद, लालमाठ या पाच गौरी स्वरूप वनस्पतींचे विसर्जन जलाशयात केले जाते. अनेक ठिकाणी बहुतेक नद्यांवर विसर्जनासाठी घाट बांधण्यात आलेले आहेत. या घाटावर बाप्पाची आरती करून नंतर नद्यांमध्ये किंवा ओहळात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते. कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने गणेश विसर्जन करताना भक्तगणांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.
कल्याण-डोंबिवलीत ११ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन
मुसळधार कोसळत असलेल्या पावसात, ढोल ताशांच्या गजरात कल्याण, डोंबिवलीतील भाविकांनी शनिवारी वाजत गाजत ११ हजार ५४७ गौरी-गणपतीचे विसर्जन केले. १५ सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबत नसल्याने गणेश भक्तांनी सायंकाळी भरपावसात वाजत गाजत गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात केली. रस्तोरस्ती गणपती बाप्पा मोरया चा जयघोष सुरू होता. दुर्गाडी किल्ला गणेश घाट, काळा तलाव, गौरीपाडा तलाव, आधारवाडी तुरुंग तलाव, डोंबिवलीत गणेशघाट, गणेशनगर घाट, देवीचापाडा घाट अशा ६८ नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी, तसेच शहराच्या भागात पालिकेने रस्तोरस्ती ६८ कृत्रिम तलाव तयार केले होते. या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले. पालिकेच्या १० प्रभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. डोंबिवलीत कलारंग प्रतिष्ठानच्या सामुहिक गणेश विसर्जन मिरवणुकीला घरगुती गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुसळधार पाऊस. गणपतीच्या मिरवणुका सायंकाळी सुरू होणार असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी होती. शहरातील मुख्य, वर्दळीच्या रस्त्यांवर पोलीस, वाहतूक पोलीस तैनात होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात १६८३० गणेश मूर्तीचे तसेच १००६ गौरी मूर्तीचे विसर्जन
श्रीसह गौरी विसर्जनाच्या पाचव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील तील विसर्जनस्थळांवर एकूण १६८३० गणेश मूर्ती तसेच १००६ गौरी मूर्ती अशा एकूण १७८३६ मूर्तीचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन झाले. त्यात १७१ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश व गौरी मूर्तींचे विसर्जन केले. विसर्जनादरम्यान सुमारे १५ टनहून अधिक निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्ल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले. प्रत्यक्ष विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे पाहणी केली. तसेच गणेश भक्तांचे सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा