BREAKING NEWS
latest

विरोध केला तर टोल नाके जाळून टाकू असा राज ठाकरे यांचा इशारा..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यांबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक मैदानात उतरले आहेत. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोल नाक्यावर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू" असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

दरम्यान टोलबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिकांनी टोल नाक्यावर उभे राहत चार चाकी वाहने सोडली. त्यानंतर पोलीसांनी मनसैनिकांची धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोल नाक्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलीसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेतली. वाशी टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. मनसेच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तर दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड केली. या ठिकाणाहून २० ते २५ मनसे कार्यकर्त्यांना दहिसर पोलीसांनी ताब्यात घेतले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत