BREAKING NEWS
latest

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं याबाबत दोन्ही गटांचे निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्यामुळे पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाचे, याविषयी निर्माण झालेल्या पेचावर निवडणूक आयोगासमोर प्रथम सुनावणी झाली. दोन तास झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार निवडणूक आयोगात उपस्थित होते. दोन तास सुनावणी झाल्यानंतर आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुनावणी होणार आहे.

शरद पवार गटाचा युक्तीवाद

राज्य आणि बाहेरही पक्ष कुणाचा हे सर्वांना माहिती आहे. अजित पवार गटाची पक्षाच्या विरोधात भूमिका आहे. अजित पवार गटाने पक्षाची भूमिका पाळली नाही. एक गट बाहेर पडला, मूळ पक्ष आमच्याकडे आहे. २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पवारांना पाठिंबा आहे. पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड पक्ष घटनेला धरून आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलता येत नाहीत. शरद पवारांचं नेतृत्व मान्य असं पत्र प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे. निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, असा युक्तीवाद शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

अजित पवार गटाचा युक्तीवाद

विधानसभेचे ४२ आमदार, विधानपरिषदेचे ६ आमदार, नागालँडमधील ७ आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्येकी एक खासदार अजित पवार गटाकडे आहेत. अजित पवार यांची ३० जूनला बहुमतानं अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर आहेत. विधानसभा, विधानपरिषदेचे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर आहेत. अनेक वर्षापासून पक्षांर्तंगत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तीवाद अजित पवार गटाने केला आहे.

सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राष्ट्रवादीचे ९९ टक्के कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असून अजित पवार गटाची कागदपत्रं ही खोटी आहेत. आयोगासमोर आम्ही सक्षमपणे बाजू मांडत आहोत, असे त्यांनी सांगितलं.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत