स्वयंपाकाच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर केंद्र सरकारनं १०० रुपयांचं अतिरिक्त अनुदान जाहीर करत सर्वसामान्यांना सुखद धक्का दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत सरकार या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपये अनुदान देत असे. आता त्यात १०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सिलिंडर मागे अनुदानाची एकूण रक्कम आता ३०० रुपये झाली आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना आता स्वयंपाकाचा गॅस अवघ्या ६०० रुपयांत मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. या अंतर्गत पहिला गॅस सिलिंडर आणि शेगडी मोफत दिली जाते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना याचा लाभ मिळतो. ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधनाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये २०० रुपयांची कपात केली होती. त्यामुळं सिलिंडरच्या किंमती थेट २०० रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी गॅस सिलिंडरच्या किंमती ९०० रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या. तर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांच्या सिलिंडरची किंमत ७०० रुपयांवर आली होती. त्यात आता आणखी १०० रुपये कमी होणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा