BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत मनसेचा तडकाफडकी नवा शहरअध्यक्ष नेमणुकीच्या निर्णयाने कार्यकर्ते अचंबित..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

     मनसे पक्षाच्या डोंबिवलीतील एकमेव आमदार असलेल्या पक्षाचे जुने शहरअध्यक्ष मनोज घरत यांना तडकाफडकी हटवून नवीन शहराध्यक्ष पदी राहुल कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक घेतलेल्या या  तडकाफडकीच्या निर्णयाने शहरातील आजी माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अचंबित झाल्याचे दिसून येत  आहे. या बाबतची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याचे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून या आधी सन २०१९ ला विधानसभेच्या तोंडावर मनोज घरत यांना हटवून त्यांना कल्याण ग्रामीण ची जबाबदारी देण्यात आली होती. या वेळी अद्याप तरी कोणतीही जबाबदारी दिल्याची माहिती मिळालेली नसून तडकाफडकी केलेल्या पदाच्या मांडणीने चर्चांना उधाण आले आहे. 

शहराध्यक्ष बदलीचे नेमके कारण काय ? 

   या मागे मागील काही महिन्यांपूर्वी पासूनची पक्षाची अंतर्गत धुसफुस, गटबाजी असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेले व मनसेच्या रस्ते - आस्थापना विभागाचे डोंबिवली शहरअध्यक्ष ओम लोके यांच्या नाराजीची पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळत आहे. लोके यांनी प्रतिनिधीशी बोलताना पक्षाचे शीर्ष नेतृत्व शहरात आले असताना पक्षाच्या प्रमुख पदावर असताना देखील केवळ स्वागतासाठी डावलले जाणे हे एक प्रकारे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले होते. यासारख्या अशा अनेक कारणांमुळे पक्षात आपली घुसमट होत होती, काम करण्याची संधी मिळत नव्हती त्यामुळे मनसेला राम राम ठोकत शिवसेना शिंदे गटात सामील झाल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान पक्ष सोडल्यानंतर त्यांना मुंबई येथे खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीचे निमंत्रण धाडले व तेथे शहरातील पक्षाच्या उणीवांचा पाढाच बोलून दाखवल्याने त्याची परिणीती शहराध्यक्ष नेमणुकीतून दिसून येत असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मिळत आहे. 

   पक्षाकडून याबाबतीत अधिकृतरीत्या अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून मनोज घरत हे पक्ष स्थापने पासूनचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून २०१० ते २०१५ या कार्यकाळात ते पक्षाचे नगरसेवक म्हणून पालिकेत कार्यरत होते. २०१५ नंतर पक्षाच्या कमजोर काळात त्यांनी पक्षाची जबाबदारी खुबीने पेलली ही त्यांची जमेची बाजू ठरली. परंतु गेल्या काही महिन्यांत शहरात पक्ष आहे की नाही अशी अवस्था असताना पदाधिकारी कमालीचे नाराज होते. आजच्या शहराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर राहुल कामत हे नव्याने शहरातील पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. कामत हे राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असून लोकसभेच्या दृष्टीने त्यांच्याकडे वेळ कमी असल्याने पक्षाचे इंजिन पूर्वपदावर आणणे हे जोखमीचे काम त्यांच्यावर येऊन ठेपले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत