BREAKING NEWS
latest

बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली - सध्या मुंबई ठाणे कल्याणात एकच जयघोष ऐकायला व पाहायला मिळत आहे "जय श्रीराम जय श्रीराम".. आपल्याला लवकरच आयोध्येत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे राम मंदिर उभारत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते. ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन करत येत्या काळात लवकरच राम मंदिराचे काम पूर्ण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत सुरू असलेल्या डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन रासरंग दांडिया फेस्टिव्हल मध्ये उपस्थित दांडिया प्रेमी भक्तांना दिले.
कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे येत दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील हे यावेळी उपस्थित होते. 
यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवली येथे आपले पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या 'रासरंग' दांडिया फेस्टिव्हल या डोंबिवलीच्या सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवाला हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला. राज्यात आमचे सरकार येताच सगळे निर्बंध आम्ही उठवले आहेत. मंदिरं खुली केली, सण उत्सवांवरील बंदी उठवली व नवरात्र उत्सव शेवटच्या तीन दिवशी सरकारने १२ वाजेपर्यंत परवानगी दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी सगळ्या सण उत्सवांची बंधनं उठवली, मंदिरं खुली केली असे ही ते म्हणाले. पूर्वी लोकांना मुंबई आणि ठाणे इथे गरबा खेळण्यासाठी जायला लागायचे आता डोंबिवलीत लोकसभेचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजन केले आहे असा उल्लेख खासकरून त्यांनी केला.

अयोध्येत लवकरच जायचे आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

त्यानंतर त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यात सगळीकडे "जय श्रीराम जय श्रीराम" गीत  म्हणतात असे म्हणत त्यांनी तुमच्या इथे श्रीरामाचे गीत लागलं का नाही ? असा प्रश्न आयोजकांना करताच ते गीत आयोजकांनी त्वरित लावले. यावर 'एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम' असे शिंदे म्हणताच जय श्रीराम च्या घोषणांनी भाविकांनी परिसर दणाणून सोडला. अयोध्येत राम मंदिर बनत आहे. लाखो करोडो भक्तांचे स्वप्न साकार होत आहे. आणि मोदीजी ते काम करत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या लोकांचे हे सरकार आहे तुम्हाला जे हवं आहे तेच हे सरकार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेत केली आरती

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून गेल्या ५४ वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा देखील नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन हजारो लाखो भाविक घेत असतात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली. वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी साडे ७ कोटी मंजूर केलेले आहेत. त्यात अडीच कोटींचं काम सुरू आहे आणखी ५ कोटी रुपयांचे काम सुरू होईल आणखी जे काही कामाला पैसे लागतील ते देखील शासनाच्या वतीने देण्यात येतील. या किल्ल्याची या देवस्थानाची अनेक वर्षाची पुरातन परंपरा आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र मध्ये यंदा नवरात्र उत्सवात गेल्या वर्षी पेक्षा भाविक आणि भक्तगणांमध्ये जास्त उत्साह यावर्षी पाहायला मिळतं आहे असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत