BREAKING NEWS
latest

आपल्या सण-उत्सवाचं हसू होतंय का?

रोहन दसवडकर

प्रश्न वाचूनच तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा ब्लॉग हा कशा संदर्भात आहे. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आपण सर्वांनीच मोठया थाटामाटात साजरी केली. सर्वजण अगदी त्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात रममय झाले होते. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव ह्या दोन्ही उत्सवांच्या वेळेस मोठया प्रमाणावर आपल्याला सर्वत्रच गाणी वाजलेली ऐकायला मिळतात. नवरात्रोत्सवात तर सर्वत्र गरबा खेळला जातो. गणपती आगमन किंवा विसर्जन असो त्या वेळेस वेगवेगळी गाणी लावली जातात आणि आपण ही त्या वातावरणात बेधुंदपणे नाचतो,त्या क्षणाचा आनंद घेतो. 

मात्र त्या क्षणाचा आनंद घेत असताना कुठे तरी आपलं त्या उत्सवाकडे किंवा त्या पारिवारिक माहोल, भक्तिमय वातावरण ज्याला आपण म्हणतो त्याकडे दुर्लक्ष होत आहे का? ह्या गोष्टी कडे आपण कितीसे लक्ष देतो? गरब्याला किंवा विसर्जनाच्या वेळेस सर्रास कोणतीही गाणी वाजवली जातात. त्या गाण्यांचा त्या उत्सवाशी,त्या प्रसंगाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. खरच त्या गाण्याचा अर्थ जर ओळीनुसार आपण काढायला गेलो तर आपल्यालाच आपली लाज वाटेल. इतका बीभत्स अर्थ त्या गाण्यांचा असतो. मात्र अशी गाणी आपण आपल्या सणांमध्ये, आपल्या ईश्वर कार्यात स्वतःच्या मनोरंजनासाठी लावतो. आणि त्या सोबतच करून घेतो ती म्हणजे आपल्या धार्मिक सणांची, आध्यात्मिक गोष्टींची, आपल्या प्रथा, परंपरांची शोभा!

नवरात्रीच्या सातव्या दिवशी मी आणि माझी मोठी बहीण आम्ही गावी जाण्यासाठी रात्री अकराच्या दरम्यान रिक्षातून एसटी स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी निघालो. रस्त्यात आम्हाला ट्रॅफिक लागले. आणि म्हणून काही मिनिट ट्रॅफिकमध्ये आम्ही तिथेच अडकलो. आमच्या बाजूलाच एक सोसायटी होती तिथे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ होतं.देवीची तीन ते चार फूट उंच अशी मूर्ती तिथे बसवण्यात आली होती. समोरच देवीचा घट बसवला होता. धूप, अगरबत्ती ह्यांचा सुगंध त्या मंडळाच्या आजूबाजूला पसरला होता. तो पर्यंत सर्व ठीक होत. पण त्याच मंडळाच्या पुढे काही पोरं आणि पोरी नाचत होते. कदाचित गरबा संपायची वेळ झाली असेल म्हणून ते गरबा न खेळता मुक्तपणे नाचत होते. ज्याला सो कॉल्ड गणपती डान्स आपण म्हणतो. (त्या नृत्य शैलीचा आणि गणपती बाप्पाचा काहीही संबंध नाही). पोर पोरी नाचत होते मोठ्यप्रमाणावर लोकं तिथे उपस्थित होते. व्हिडिओ काढणे, सेल्फी घेणे सारे सुरूच होते. इथपर्यंत सर्व ठिक वाटलं आणि मग गाणं लागलं "आये राजा राजा राजा करेजा मै समाझा उठला तानी कोरा भेटाय खूबे माझा" ह्यांचा मराठी मध्ये अर्थ मुद्दामून पुढे देत आहे जेणेकरून आपण जी गाणी आपल्या अशा धार्मिक कार्यात लावतो त्याचा अर्थ आपल्याला कळणे गरजेचं आहे. त्याचा अर्थ असा की ("हे राजा, राजा, राजा, ये आणि माझ्या हृदयात स्थान घे मला तुझ्या मिठीत घे, खूप मजा येईल) ह्याच गाण्याचा पुढच्या ओळींचा अर्थ तर सांगण्या सारखा पण नाही. आणि ह्या गाण्यावरती त्या देवीच्या मूर्तीसमोर तिच्या पवित्र अशा त्या घटासमोर तिथली लोकं एकमेकांच्या अंगावर पडेपर्यंत जोरजोरात नाचत होती. 

खरच त्या रिक्षा मध्ये बसून एवढा राग आणि कीव ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी वाटत होत्या. सुदैवाने ट्रॅफिक सरले आणि आमची रिक्षा पुढे गेली म्हणुन तरी तितकाच प्रसंग बघायला मिळाला. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त आपल्या क्षणिक आनंदासाठी आपण कोणती गाणी लावतो आपण कोणत्या गाण्यांवरती जिवतोडून नाचतो हे तर कळणे गरजेचे आहे ना. इतके आपण नऊ दिवस त्या नवरात्रीचे गोडवे गाऊन जर त्याच दिवसात संध्याकाळी असा आपल्या संस्कृतीला लाज आणेल असा काही प्रकार करत असू तर खरच कुठे ना कुठे आपल्याकडूच आपल्या धार्मिक सण-उस्तवांच हसू होतय. आपल्याला त्याची महती कळलेलीच नाही. असच म्हणावं लागेल.

« PREV
NEXT »

1 टिप्पणी