BREAKING NEWS
latest

मनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणावर; सरकारच्या हालचालींना वेग..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला असतानाच मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर, सरकारी हालचालींना वेग आल्याचे चित्र समोर येत आहे. आंतरवली सरावटी इथे जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली, यावेळी पाणी, अन्न, सलाईन, उपचार यापैकी काहीही घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र लगेचच मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधत '"सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यानी शपथ घेऊन आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे" असे ते म्हणाले. मात्र आपण आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निर्णय बदलणार नाही असे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.

यानंतर दुपारी छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. मात्र किमान पाणी तरी घ्यावे असे आवाहन केल्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी पाणी सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीला गेले असून आरक्षण या विषयावर काही तोडगा निघतो का याची चाचपणी ते करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान राज्यभरात मराठा समाजाची रस्त्यावर उतरून जरांगे-पाटील यांना पाठींबा देत त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत आहे, काही ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही तर, तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांना गावात राजकीय कार्यक्रमावर समाजाकडून बंदी घालण्यात येईल असेही जाहीर झाले आहे. भाटघर आणि नीरा देवघर धरणातून एकही थेंब पाणी सोडू नं देण्याचा इशारा देत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर भाटघर धरणात जलसमाधी घेऊ, अशी आंदोलकांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत