BREAKING NEWS
latest

कल्याण पुर्वेत ६६ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी २४८ जणांविरुद्ध कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

महावितरणच्या कल्याण पुर्व विभागात दोन दिवसांच्या व्यापक शोध मोहिमेत ६६ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून याप्रकरणी २४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच टिटवाळा उपविभागातही ३८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी एकाच दिवसात ८४ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे.

 कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय ओंढेकर आणि कल्याण मंडल - १ चे अधीक्षक अभियंता दीपक पाटील आणि कल्याण मंडल - २ चे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी शोध मोहिम सुरू आहे. कल्याण पुर्व विभागातील आडीवली - ढोकली, मानपाडा, दावडी, हेदुटणे, घेसर, कोळेगाव, सोनारपाडा, काटेमानिवली, काटाई या भागात दि. ६ आणि १० ऑक्टोबरला व्यापक शोध मोहिम राबवण्यात आली. यात २४८ ग्राहकांकडे वातानुकूलीत यंत्रणेसाठी थेट वीजवापर, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅप करून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या ग्राहकांनी ६६ लाख रुपये किंमतीची ३ लाख ३ हजार ८०० युनिट वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून वीज चोरीचे आणि तडजोडीची रक्कम भरण्याची नोटिस संबंधितांना बजावण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते कांतीलाल पाटील, नितीन चंदनमोरे, मुंजा आरगडे, उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, अभियंते, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या चमुने ही कारवाई केली. तर टिटवाळा उपविभागातील मांडा, गोवेली, कोन आणि खडवली शाखा कार्यालयांतर्गत घेतलेल्या व्यापक शोध मोहिमेत ८४ जणांनी ३८ लाख ७९ हजार रुपये किंमतीची १ लाख ८१ हजार युनिट वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते अभिषेक कुमार, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे, सचिन पवार आणि जनमित्रांच्या पथकाने ही कामगिरी केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत