BREAKING NEWS
latest

'एनसीईआरटी' पाठ्यपुस्तकांमध्ये आता 'इंडिया' ऐवजी फक्त ‘भारत’ असा उल्लेख..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

नवी दिल्ली : सध्या देशभर आपल्या देशाला 'भारत' म्हणावे की 'इंडिया' याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे. यातच आता एनसीईआरटी ने ठोस भूमिका घेत पाठ्यपुस्तकांतील 'इंडिया' हा शब्द काढून त्याजागी 'भारत' या संबोधनाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने काही ना काही बदल करत असते. कधी अभ्यासक्रमात काहीतरी समाविष्ट केले जाते तर कधी हटवले जाते. आता एनसीईआरटीने एक मोठा निर्णय घेतला असून पुस्तकांमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' या शब्दाचा उल्लेख असणार आहे. एनसीईआरटीने याला मंजुरी दिली आहे. यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपल्या देशाला इंग्रजीमध्ये 'इंडिया' असे संबोधले जाते. भारताला प्राचीन इतिहास आहे, त्यामुळे नागरिकांकडून अनेकदा भारताचे इंग्रजीमधील नावही भारत असे असावे अशा मागणी केली जात आहे. अशातच आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) पॅनेलने सर्व एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांमध्ये 'इंडिया'च्या जागी 'भारत' या शब्दाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पॅनलच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. आगामी पाठ्यपुस्तकांमध्ये हा बदल दिसून येईल.

हा प्रस्ताव सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता, परंतु आता त्याला औपचारिक पाठिंबा मिळाला आहे. एनसीईआरटी पॅनलच्या सर्व सदस्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 'इंडिया' की 'भारत' असा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत असताना एनसीईआरटी ने ही घोषणा केली आहे. त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एनसीईआरटी समितीचे अध्यक्ष सी.आय आयसॅक यांनी याबाबत म्हटले की, ‘पॅनेलने सर्व विषयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. शालेय पुस्तकांमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हे नाव लिहिण्याची शिफारसही करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाऐवजी आता शास्त्रीय इतिहास नवीन पुस्तकांच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे.’
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत