दिनांक ९-१० सप्टेंबर रोजी राजधानी दिल्ली येथे अत्यंत दिमाखदार स्वरूपात 'जी-२०' शिखर परिषद आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दिल्लीचे सुशोभिकरण करण्यात आलो होते. यासाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र आता हे सुशोभिकरणाचे काम अगदीच तकलादू असल्याचे समोर येत आहे. परिषद उलटून पंधरवडा उलटत नाही तोच राजधानी दिल्लीची दूरावस्था झाल्याचे चित्र दिसत आहे. पूर्व दिल्लीतील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या विकास मार्गावरील विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर आणि फूटपाथवर कचऱ्याचा ढीग आहे. जवळपास सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह लोक उघड्यावरच विधी उरकत आहेत.
उपहार गॅलरी, सरकारी दारू दुकान, गोपाल बेकरी, शुभम इटिंग सेंटर, बेल्जियम सलून यासह अनेक ठिकाणी बसवलेले खांब तुटले आहेत. बेल्जियम सलून समोरील मॅनहोलचे झाकणही कोसळण्याच्या बेतात आहे. कर्करडूमा कडून येणाऱ्या रस्त्यावरील विकास मार्गाच्या पलीकडे असलेल्या देव वाइल्डर जवळ अनेक दिवसांपासून मॅनहोल उघडे पडले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पीडब्ल्यूडीने येथे कोणतेही बॅरिकेड लावलेले नाही. याबाबत लक्ष्मी नगरचे आमदार अभय वर्मा म्हणाले की , आम्ही २१-२३ जून रोजी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता ए.के.राजदेव यांच्याकडे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे फायबर खांब बसवले जात असल्याची तक्रार केली होती. मात्र, त्यांनी काम थांबवण्याऐवजी निकृष्ट साहित्याचा वापर करून बांधकाम सुरूच ठेवले. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे व 'एलजी'ने याची चौकशी करावी. एकंदरीतच जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने आंतराष्ट्रीय पाहुण्यांसमोर चकाचक राजधानी दाखवण्याचा प्रयत्न अल्पावधितच फोल असल्याचे समोर आल्याने आता सरकारला दिल्लीतील सामान्य नागरिकांकडून रोषास सामोरे जावे लागणार असे चित्र दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा