इस्लामाबाद प्रांतातून मंदी आणि महागाईचा कहर झालेल्या पाकिस्तानची आता अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वेगळ्याच कारणामुळे नामुष्की झाली आहे. अरेबियामधील मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र मक्का मशिदीच्या दर्शनाला तीर्थयात्रीच्या व्हिसावर जाणारे अनेक पाकिस्तानी नागरिक भीक मागण्याचे काम करतात. परदेशातून अटक करण्यात आलेल्या एकूण भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सौदी अरेबिया आणि इराक पाकिस्तानवर नाराज आहेत अशी माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. डॉन (डीएडब्लूएन) या वृत्तसंकेतस्थळाच्या माहितीनुसार, परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी एकट्या पाकिस्तानातील आहेत.
संसदेच्या स्थायी समितीला बुधवारी सांगण्यात आले की, पाकिस्तान सोडून जाणाऱ्या लोकांपैकी सर्वाधिक भिकारीच आहेत. विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी कुशल आणि अकुशल कामगार देश सोडून जात असल्याची आकडेवारी संसदेत देत असताना भिकाऱ्यांसंदर्भातली आकडेवारी जाहीर केली. हैदर म्हणाले की, सौदी अरेबियामध्ये सध्या तीस लाख पाकिस्तानी आहेत, यूएईमध्ये १५ लाख आणि कतारमध्ये दोन लाख पाकिस्तानी नागरिक आहेत.
हैदर यांनी संसदेच्या स्थायी समितीला माहिती देताना म्हटले की, अनेक भिकारी तीर्थयात्रेसाठी असलेल्या व्हिसाचा गैरफायदा घेऊन सौदी अरेबिया, इराण आणि इराक येथे जातात. एकदा का तिथे पोहोचले की, मग ते भीक मागायला सुरुवात करतात.
'एक्सप्रेस ट्रिब्यून' या संकेतस्थळाने हैदर यांच्या वक्तव्याचा हवाला देताना सांगितले की, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर भिकारी बाहेर पडत आहेत. ते अनेकदा बोटीतून प्रवास करतात आणि नंतर 'उमराह' आणि 'व्हिजिट व्हिसा'चा गैरवापर करून परदेशातील यात्रेकरूंकडून भीक मागतात. तसेच हैदर पुढे म्हणाले की, पवित्र मशीद मक्का आणि परदेशातील तीर्थक्षेत्राजवळ मोठ्या प्रमाणात पाकिटमारांना अटक करण्यात आली आहे. हे पाकिटमार पाकिस्तानी नागरिक असल्याचे लक्षात आले आहे.
दरम्यान आजवर आपली संपूर्ण ताकद भारताविरुद्ध कुरापती काढण्यात वाया दवडणाऱ्या पाकीस्तानी राजकारण्यांनी देशविकासाकडे पुरेसे लक्ष न दिल्याने आज सर्वसामान्य नागरिकांवर ही नामुष्की उद्भवली असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा