BREAKING NEWS
latest

सुशिक्षित व सुसंस्कृत डोंबिवली नगरीतील जोंधळे शाळेत ८० चिमुरड्यांना शिक्षिकेकडून रॉडने बेदम मारहाण..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

   सुशिक्षित आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या डोंबिवली नगरीत पश्चिमेकडील एस.एच.जोंधळे विद्यालयात ८० चिमुरड्यांना लाकडी बांबू तसेच स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही मारहाण सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुरड्यांनी तीन दिवसांचा मार असाह्य झाल्यानंतर आपआपल्या पालकांकडे त्याची वाच्यता केल्यानंतर पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. संतप्त पालकांनी एकत्र येत शाळा प्रशासनाला या कृत्याचा जाब विचारण्यासाठी मुख्याध्यापक कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले. त्याचबरोबर शहरातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसे विध्यार्थी सेनेने मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या  पाठीवरील तसेच हातावरील वळ दाखवत प्रसिद्धी माध्यमांसमोर त्याचा खुलासा केला. त्याचबरोबर शिवसेना (दोन्ही गट) पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या प्रशासनाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. 
मारहाण केलेल्या शिक्षिकेचे नाव निलिमा भारमळ असे असल्याचे समजते व नुकतीच पाच दिवसांपूर्वी ती रूजू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच संबंधित शिक्षिकेचा बायोडाटा सुध्दा शालेय प्रशासनाकडे मिळत नसल्याची धक्कादायक माहिती मिळत असून परिणामी तिचा पत्ता देखील मिळण्यास अवघड आहे. तसेच संबंधित शिक्षिकेचा संपर्क देखील होत नसून पालक, सामाजिक कार्यकर्ते यांची गर्दी शाळेत होत आहे. शालेय प्रशासनाकडून आतापर्यंत या प्रकाराची माहिती आत्ताच  मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान विष्णुनगर पोलीस प्रशासनाने याची दाखल घेतली असून त्या शिक्षिकेचा पुढील तपास चालू केला आहे.

घटना घडल्याची माहिती कळल्यापासून आम्ही पालकांसोबत आहोत. अजूनही ती शिक्षिका समोर आली नसून तिचा बायोडाटा देखील उपलब्ध नाही. या प्रकरणात ती शिक्षिका कोणाच्या ओळखीने या विद्यालयात कामाला लागली ? तिच्या रुजू होण्यामागे कोणत्या मोठ्या व्यक्तीचा हात आहे या सर्व गोष्टींची चौकशी होण्याची आम्ही मागणी केली असून चिमुरड्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे असे मनसे विद्यार्थी सेना, डोंबिवली शहर चे सचिव प्रितेश म्हामुणकर यांनी पत्रकारांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत