BREAKING NEWS
latest

मध्य रेल्वेच्या 'कल्याण जंक्शन' स्थानकातून विनातिकीट फुकट्या प्रवाशांकडून १६.८५ लाखांचा दंड वसूल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

  मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकामध्ये कल्याण रेल्वे जंक्शनचा समावेश होतो.
मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात मोठे वर्दळीचे स्थानक आहे. अशा या रेल्वे स्थानकात सोमवारी तिकीट तपासणीची मोहीम राबवून  विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या एकूण ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात रु. १६ लाख ८५ हजार दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वे मुंबई विभागाचे १६७ तिकीट तपासणीस कर्मचारी आणि दोन अधिकारी अरुण कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि डग्लस मिनेझिस सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) आणि ३५ आरपीएफ कर्मचारी कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी मोहिमेत सहभागी होते. अशीच प्रवासी तिकीट मोहीम मध्य रेल्वेने प्रत्येक स्थानकात राबवल्यास रेल्वेच्या गंगाजळीत चांगलीच रक्कम जमा होईल.

या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या ४,४३८ प्रकरणांतून एका दिवसात रु. १६.८५ लाख दंड वसूल करण्यात आला. सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरी, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते.

हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरीय रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाड कडे  तर आग्नेय शाखा कर्जत मार्गे  पुण्याकडे  धावते. मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात मोठे वर्दळीचे स्थानक आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरून येणारे प्रवासी कल्याण स्थानकात उतरतात. लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यातून अनेकजण फुकट प्रवास करत असतात. यामुळे प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांचे नुकसान होत असते. रेल्वेकडे फुकट्या प्रवाशांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

रेल्वेने फुकटचा प्रवास करणे हा गुन्हा मानण्यात येतो. पण अनेकजण फुकटचा प्रवास करत असतात. मध्य रेल्वेने गेल्या काही वर्षात नव्याने तिकीट तपासणीसांची (टीसी) भरती केलेली नाही. त्यामुळे असलेल्या टीसी मंडळींवर ताण पडत आहे. सात फलाट, त्याच्या तुलनेत टीसी मंडळींची अपुरी संख्या  असल्याने फुकट्या प्रवाशांची चांदी होत आहे. रेल्वे प्रशासन विविध प्रकल्प हाती घेते असे असताना त्यांना पुरेसे मनुष्यबळ पुरवायला कठीण होत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत