निष्काम कर्मयोगी, वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांच्या ‘सेवा परमो धर्म’चा वसा आणि वारसा व्यापकपणे मुंबईच्या श्री गाडगे महाराज धर्म शाळेच्या माध्यमातून देशभरात पोहोचविणारे प्रशांत गोविंदराव देशमुख यांचे पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नामांकन दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिफारस केल्याची माहिती मिळत आहे.
निष्काम कर्मयोगी गाडगे महाराजांनी दशसूत्रीच्या माध्यमातून मानवी कल्याणाची नवी व्याख्या समाजाला घालून दिली. महाराष्ट्रभरात गाडगे महाराजांनी शाळा, आश्रम शाळा, धर्मशाळा, सदावर्ते, अन्नछत्र सुरू करून गोरगरीब नागरिकांची सेवा केली. त्यांचा विचार समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी दादरच्या (मुंबई) धर्म शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करणारे प्रशांत देशमुख हे गत ३ दशकापासून कर्क रुग्णांसाठी मायबाप म्हणून काम करत आहेत. मुंबईच्या टाटा ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या कर्क रुग्णांची दादरच्या धर्म शाळेत निवासाची सोय करणे, वैद्यकीय उपचारासाठी मदत करणे, अन्नछत्राच्या माध्यमातून मोफत भोजनाची सोय करणे इत्यादी कार्य प्रशांत देशमुख हे अविरतपणे करत आहेत.
ही बाब लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मनोज कोटक, खासदार मनोज तिवारी, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी तशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रशांत देशमुख यांची केली आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, अशी व्यापकपणे मागणी महाराष्ट्रभरातून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून पुढे येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा