BREAKING NEWS
latest

कै. प्रा. यु.डी.इंगळे स्मृती करंडक राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत पुरुषांचे पुण्याला तर महिलांचे ठाण्याला अजिंक्यपद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

परभणी, दि.२० नोव्हेंबर : कै. प्रा. यु.डी.इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यंदा गतविजेत्या मुंबई उपनगर व पुण्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात पुणे व महिला गटात ठाणे यंदाच्या विजेतेपदाचे मानकरी ठरले. पुण्याचे राहुल मंडल व काजल भोर हे अनुक्रमे राजे संभाजी व राणी अहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कै. प्रा. सुरेश जाधव क्रीडानगरीत झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरला पुण्याने अत्यंत चुरशीच्या लढतीत २५-२३ असे २ गुणाने नमविले. मध्यंतराच्या ६-७  अश्या पिछाडीनंतर मुंबई उपनगरने बहारदार खेळी करीत १६-१६ अशी बरोबरी केली होती. परंतु नऊ मिनिटाच्या जादा डावात पुण्याने बाजी मारत गतवर्षीच्या पराभवाची सव्याज परतफेड केली. पुण्याच्या विजयाचे शिल्पकार राहुल मंडल व प्रतिक वाईकर हे ठरले. राहुलने या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचे तर प्रतीकने सर्वोत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक पटकावले. राहुलने १.३०, १.४०, १.३० मि. संरक्षण करीत आक्रमणात तीन गडी टिपले. प्रतीकने आक्रमणात सहा गडी बाद करीत २.१० मिनिटे संरक्षणाचा खेळ केला. अथर्व डहाणे व आदित्य गणपुले यांनीही प्रत्येकी १.४० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळत संघाच्या विजयात मोठी कामगिरी केली. पराभूत मुंबई उपनगरचा ओंकार सोनवणे सर्वोत्कृष्ट आक्रमक पारितोषिकाचा मानकरी ठरला. त्याने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ३ गडी टिपले. त्यात त्यांच्या अक्षय भांगरे (१.३० मि. संरक्षण व ५ गुण ) याची अष्टपैलू खेळीही अपुरी पडली.

महिला गटातही ठाण्याने गतविजेत्या पुण्यावर १५-१४ अशी मात केली. मध्यंतराची ७-६ ही एक गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. पूजा फरगडेने आक्रमणात सहा गुण वसूल केले. रेश्मा राठोडने (१.२०, १.१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळ करीत संघाचा विजय साकारला. पूजा व रेश्मा ह्या अनुक्रमे सर्वोत्कृष्ट आक्रमक व संरक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले. किशोरी मोकाशीने १.४० व २ मिनिटे संरक्षण करीत संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. पराभूत पुण्याची काजल भोर सर्वोत्कृष्ट अष्टपैलूची मानकरी ठरली. तिने पहिल्या डावात २.१० व दुसऱ्या डावात १.५० मिनिटे संरक्षण करीत संघाच्या विजयात चार गुण मिळवून दिले. कोमल दारवटकरनेही २.४० मिनिटे पळती करीत लढत दिली.

तृतीय स्थान - ठाणे (पुरुष), धाराशिव (महिला)

ठाणे व धाराशिवने अनुक्रमे पुरुष व महिला गटात तृतीय स्थान मिळवले. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात पुरुष गटात ठाण्याने सांगलीवर १४-१२ असा विजय मिळवला. महिला गटात धाराशिवने रत्नागिरीवर १०-८ असा डावाने विजय साजरा केला. यात ठाण्याकडून गजानन शेंगल, निखिल वाघ व लक्ष्मण गवस तर उस्मानाबादकडून ऋतुजा खरे, संध्या सुरवसे व संपदा मोरे चमकले.

या स्पर्धेची पारितोषिके प्राचार्य बाळासाहेब जाधव, आमदार मेघनादीदी साकोरे बोर्डीकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त ए.एस.पानसरे, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ.चंद्रजीत जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. जे.पी.शेळके, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा, चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, सहसचिव डॉ. राजेश सोनवणे, डॉ. प्रशांत इनामदार, माजी सचिव संदीप तावडे, रहमान काझी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, माजी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, शारदा स्पोर्ट्स ऍकॅडमीचे संचालक रणवीर राजे पंडित,  विद्यापीठ सिनेट सदस्य महेश बेंबडे, जि.प. सदस्य रवींद्र पतंगे, डॉ. कैलास पाळणे, डॉ. महेश वाकडकर, संग्राम जामकर, उद्योगपती नारायण बल्लाळ, क्रीडा अधिकारी जयकुमार ठेंबरे,  नगरसेवक सुनील देशमुख, शांताबाई इंगळे, कौशल्याबाई जाधव आदींच्या उपस्थितीत देण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत परभणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब जामकर, स्पर्धा सचिव डॉ. संतोष सावंत, सचिव डॉ. पवन पाटील, डॉ. संतोष कोकीळ, रणजित जाधव, राम चौखट, ऍड. महेश ढोबळे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील तुरुकमाने यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत