BREAKING NEWS
latest

मोबाईल एक श्वास

मोबाईल एक श्वास

  राजेंद्र चौधरी. रोझोदा
        जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याबाबींची गरज माणसाला असते. कालांतराने आरोग्य व शिक्षणचा यात समावेश करण्यात आला. मानवी जीवनात त्याच्या अपेक्षासह गरजांमध्ये कालानुरुप बदल होत असतात. बदलत्या काळानुसार माणूस हा परिवर्तनशील असतो. गेल्या पंधरा वर्षातील घडामोडींचा विचार करता आज विज्ञानाच्या अविष्कारामुळे अनेक सुविधा व तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकर झाले आहे. संगणकासह मोबाईलसारख्या अविष्काराने मानवी जीवनात अमूलाग्र बदल झाला असून संगणकामुळे कार्यालयातील रजिस्टर, अनेक कागदपत्रकांच्या फाईली म्हणावे त्या प्रमाणात निदर्शनास दिसत नाही. संगणाकाचा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. माणूस, कार्यालय अन् संगणक हे समीकरण मानव अंगिकारत असताना मोबाईल या नवीन तंत्रज्ञानाचा चंचू प्रवेश झाला. जस-जसा काळ पुढे जात गेला तस-तसा मोबाईल माणसाच्या गरजेचा भाग बनत गेला. अलिकडे मोबाईलचा अतिवापर होत असून मोबाईल जणू कित्येकांचा श्वास बनला आहे. सदुपयोगापेक्षा मोबाईलचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे मोबाईल एक चिंतेचा बनला आहे.
           आज काही अंशी कार्यालयांमध्ये टेलिफोन तेवढे दृष्टीस पडतात. काही वर्षांनी तर टेलिफोन हा इतिहासचा विषय ठरेल. एस टी डी सेवांसह एक रुपयात टेलिफोन प्रकार तर दृष्टीआड गेला आहे. आज मोबाईलने माणसाला एवढं आपलं केले की मोबाईल शिवाय तो राहूच शकत नाही. या मोबाईलपासून जसा लाभ आहे तसाच तो घातक देखील तेवढाच आहे. त्याचे दुष्परिणाम सुध्दा भयानक आहेत. हे माहीत असतानाही दरदिवशी मोबाईलमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मोबाईल काळाची एक गरज बनली असली तरी आज 'मोबाईल एक श्वास' बनला आहे. पूर्वी टेलिव्हिजनचे आकर्षण होता आता मोबाईलचे आकर्षण एवढे झाले आहे कि जेवण करताना देखील मोबाईल सुरुच असतो.   
          आता माणसाच्या जीवनावश्यक गरजांमध्ये संगणाकासह मोबाईलचा देखील समावेश झाला आहे असे म्हटल्यास वावगे तर ठरणार नाही? मोबाईल टाँवरच्या रेडियशनमुळे हजारों पक्षांचा मृत्यू झाला आहे. चिमणीसारखे पक्षी आज क्वचितच दृष्टीस पडत आहेत. काही वर्षात या रेडियशनमुळे पक्षांचे अस्तित्वच नाहीसे होण्याची भिती वाटायला लागली आहे. येणाऱ्या पुढील पिढीला केवळ पुस्तक अथवा गुगलच्या माध्यमातून पक्षी बघायला मिळतील. 
      आँनलाईन प्रणाली द्वारा शिक्षणाला प्रारंभ झाला खरी. मात्र त्यासाठी मोबाईल व नेटचा वापर वाढला. आँनलाईन शिक्षण प्रणालामुळे विद्यार्थी मोबाईलच्या अतिआहारी गेल्याचे विपरीत परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणऊ लागले आहेत. मुलांमध्ये एकलेपणा, चिडचिड, हेकेखोरपणा यासारख्या समस्यांची वाढ झाली आहे. एकंदरीत त्यांच्या वागणूकींमध्ये बदलही जाणवत आहे. काही मुलं विविध व्यसनांच्या आहारी सुध्दा गेल्याचेही चित्र आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांचे डोळे, मान, डोकेदुखी या दुखापतींसह मानसिक आजारांच्या प्रमाणात वाढ झालेली आपणास दिसणार यात शंका नाही. मोबाईल जणू भविष्यासाठी स्वीट पाँईजन ठरत आहे.
    वर्गात शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतात तेव्हा पहिल्या बाकावर बसलेला विद्यार्थी सुध्दा *"आss सर, काय बोललात तुम्ही? पुन्हा सांगा."* अशा प्रकारे सूचना विद्यार्थी करु लागले आहेत. याचा अर्थ असा की आँनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, हेडफोनचा वाजवीपेक्षा जास्त प्रमाणावर वापर झाल्याने काही अंशी कानाच्या पडद्यांवर परिणाम होण्याच्या तक्रारीत वाढ होणे स्वाभाविकच आहे. भविष्यात मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम देशातील तरुण पिढीला हानिकारक ठरणार आणि ही समस्या व आजारपण घराघरात पोहचण्याची भिती आतापासून जाणवू लागली आहे. मोबाईलच्या अतिआहारी गेल्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
      मोबाईल जणू आजच्या पिढीचा श्वास आहे. मोबाईल विषयावरुन आजवर हजारोंच्यावर बळी गेले आहेत. आत्महत्या झाल्या आहेत. भोजन मिळाले नाही तरी चालेल पण जवळ मोबाईल हे जणू जीवन जगण्याचे एक समीकरणच झाले आहे. मुला मुलींना मोबाईलच्या विरोधात आई वाडिलांनी बोलणे देखील अलिकडे भितीदायक ठरत आहे. *"आता मोबाईल ठेव, मोबाईल बंद कर"* हे सूचना वजा आवाहन आई वडिलांनी केले म्हणून रागात मुलाने आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना जाणवत आहे. आज महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल शिवाय आढळणे तसे फार कठीणच. म्हणून भविष्यात आपल्या पाल्यांबाबत मोबाईलचा विषय फारच घातक ठरणार आहे. तरुण पिढीच्या उज्वल भविष्यात मोबाईल फार मोठी अडसर ठरणार आहे. याबद्दल गांभिर्याने चिंतन होणे अपेक्षित आहे. शाळा महाविद्यालायात जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आय फोनसारखे महागडे फोन असतात. प्रतिष्ठेसाठी विद्यार्थी पालकांना वेठीस धरत असतात. मोबाईल जणू संस्कृती झाली आहे की अशी शंका निर्माण होणे स्वाभाविकच आहे.
         ज्याप्रमाणे तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता ही जागतिक समस्या ठरत आहे. त्याच बरोबर मोबाईल देखील जागतिक समस्येचा दुसरा विषय ठरण्यास अधिक वेळ वाट बघावी लागणार नाही. अर्थात आज पैशांच्या हव्यासापोटी जो तो व्यस्त झाला आहे. सुखी आनंदी जीवनाला प्राधान्य न देता अधिक संपत्तीच्या मोहापायी माणसाने जीवनाच्या सुखाकडे खूपच दुर्लक्ष केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कौटुंबिक पध्दतीने जीवनाचा आनंद उपभोगण्याचा माणूसाला अलिकडे विसर पडू लागला आहे. टेलिविजन,मोबाईल बंद ठेऊन एकत्र कुटुंब सहविचार चर्चा करणे, भोजन करणे,गप्पा मारणे हे तर जणू दुरापास्त झाले आहे. मोबाईल प्रत्येकाचा श्वास ठरत आहे. मोबाईलच्या अतिआहाराच्या धोक्यापासून स्वतःसह परिवाराचे रक्षण करणे अधिक संयुक्तिकपणाचे ठरणार आहे.  
                                        
               
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत