रोहन दसवडकर
यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी ट्रॅव्हल्सचे दरपत्रक प्रसिद्ध करूनही अनेक खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना लुटत असल्याचे चित्र आहे . पुणे यवतमाळ खासगी बसचे भाडे तब्बल पाच हजार रुपयापर्यंत आकारण्यात येत आहे . एवढ्या तिकिटात विमान प्रवास शक्य आहे . तक्रारीसाठी शासनाने सुरू केलेला हेल्पलाइन क्रमांकही अवैध दाखवत असल्याने दाद कोणाकडे मागावी , असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे . खाजगी ट्रॅव्हल्स बसेसने आकारावयाचे महत्तम भाडे दरपत्रक येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जाहीर केले.
शासन निर्णयानुसार खाजगी ट्रॅव्हल्स बसेस व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या दीडपट भाडे आकारणी करता येते . प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे दिसून आल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल , असे पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काढले आहे . बसच्या तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्यात आल्याचे आढळल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येणार करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.
27 नोव्हेंबरपर्यंत 10 टक्के अतिरिक्त भाडे आकरण्याची मुभा एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर 8 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के अधिक आहेत . त्यामुळे खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा 10 टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूक दारांना मुभा देण्यात आली आहे . ही मुभा आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे . मात्र सर्व खाजगी बस वाहनसेवा पुरवठादारांनी परिवहन विभागाने ठरवलेले भाडे दरपत्रक तिकीट बुकिंग कार्यालयात तसेच बसमध्ये प्रर्दशित करण्याच्या सूचनाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत . मात्र बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सने या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र बघायला मिळते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा