BREAKING NEWS
latest

वकील संघटनेचा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थलांतरास विरोध..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण रेल्वे स्थानकासमोर असलेले जिल्हा व सत्र न्यायालय अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास कल्याण जिल्हा न्यायालय वकील या संघटनेने विरोध दर्शविला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत याबाबतचा पत्रव्यवहार केल्यानंतर आता संघटनेच्या वतीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत न्यायालयाच्या इमारतींचा पुनर्विकास सध्याच्या जागेत आहे त्याच ठिकाणी करण्याची विनंती केली आहे.

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय पश्चिमेकडील बारावे येथील जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ती जागा सोयीची नाही याकडे वकील संघटनेने लक्ष वेधले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांसाठी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय आहे. कल्याण रेल्वे स्थानक आणि बस स्थानकालगत न्यायालय असणे हे पक्षकार, वकील, न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी सोयिस्कर आहे. न्यायालयात येण्याचा प्रवास खर्च परवडणारा असून या ठिकाणी वेळेवर पोहोचता येते. त्यामुळे सध्या ज्या ठिकाणी न्यायालय आहे त्या जागेमध्येच न्यायालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. न्यायालयात याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

नागरिक, पक्षकारांचा पाठिंबा

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थलांतराला शंभर टक्के वकिलांनी विरोध केला असताना पक्षकार आणि कल्याणमधील नागरिकांनीही वकिलांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे स्थलांतर लोकहिताचे नाही व लोकशाहीला धरून होणार नाही याकडे वकील संघटनेने हायकोर्टाचे लक्ष वेधले. आहे. महिला कर्मचारी, महिला वकील भगिनी यांच्यासाठीची सध्याची जागा सुरक्षित आहे. त्यामुळे याच ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी कल्याण जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. गणेश नरसू पाटील यांनी उपस्थित पत्रकारांसमोर केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत