BREAKING NEWS
latest

सांस्कृतिक डोंबिवली नगरीत उभारणार साहित्य-क्रीडा नगरी दर्शविणारे प्रवेशद्वार - मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली ही एक सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जात असून या नगरीचे महत्त्व दर्शविण्यासाठी 'साहित्य-क्रीडा प्रवेशद्वार' डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात येत आहे. साहित्य नगरी, क्रीडा नगरी दर्शविणारे असे हे प्रवेशद्वार असणार आहे. या कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. येत्या चार ते पाच महिन्यात हे काम पूर्ण होऊन डोंबिवली स्टेशन परिसराचा कायापालट होईल असे आश्वासन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिले.

डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी या कामाचे भूमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. या सुशोभीकरणाअंतर्गत डोंबिवली रेल्वे स्टेशन येथील ८ प्रवेशद्वार नव्याने बनविण्यात येणार आहेत. डोंबिवलीतील साहित्यिक, खेळाडू, कलाकार यांची माहिती भिंतीवर रेखाटण्यात येणार आहे. तसेच प्रवेशद्वारांना साहित्य नगरी, क्रीडा नगरी, चित्रपट नगरी असे नाव देण्यात येणार असून हे प्रवेशद्वार डोंबिवलीची एक वेगळी ओळख बनवतील असे यावेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले. तसेच स्टेशन बाहेरील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून दोन अडीच वर्षापूर्वी निधी अभावी हे काम रखडले होते. मात्र राज्यात शिंदे-फडणविस सरकार येताच निधी मंजूर करण्यात आला. येत्या ४ ते ५ महिन्यात हे काम पूर्ण होईल असे राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत