BREAKING NEWS
latest

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे कालवश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरव्हा श्वास घेतला. रवींद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते काही काळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपावून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेता असण्यासोबतच रवींद्र बेर्डे यांची आणखी एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू होते. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले होते. 

३०० हून अधिक चित्रपटात काम केले

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते १९६५ मध्ये रंगभूमीवर आले. ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

या कलाकारांची उत्तम जोडी

अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांची जोडी पडद्यावर खूप गाजली होती. अनेक प्रकारच्या पात्रांनी त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. रवींद्र बेर्डे  मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील सक्रिय होते. सिंघम, चिंगी यासारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती.

कर्करोगाने ग्रस्त होते

१९९५ मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ साली त्यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते. मात्र कलेशी जोडून त्यांनी या अडचणींवर सहज मात केली. कॅन्सरने त्रस्त असून देखील ते नाटक बघायला जायचे. यावरून त्यांची कला व नाटकाची आवड लक्षात येते. ते कायम स्मृतीत राहतील.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत