डोंबिवली दि.२२ : डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सर्वत्र सुरु असून डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागात सिमेंट काँक्रीटीकरण झालेले रस्ते हलगर्जीपणा आणि चुकीच्या नियोजनामुळे पुन्हा खोदावे लागत आहेत अशी परिस्थिती आहे. निवासी भागातील अनेक महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार नसल्याचे समजल्याने सुमारे १५० नागरिकांनी तोंडावर मास्क बांधून हातात फलक घेऊन मुक आंदोलन केले होते. आता भाजपने गोग्रासवाडी येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात निष्काळजीपणा करत चुकीच्या कामामुळे जनतेचा पैसा वाया जात असल्याचा आरोप पत्रकारांशी बोलताना केला.
भाजप नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी प्रशासनाला विचारला जाब
.
डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे अनेक महिन्यापासून रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने रास्ता पूर्णतः बंद आहे. या कामाकडे भाजपचे माजी नगसेवक निलेश म्हात्रे आणि समाजसेवक अनिल ठक्कर यांनी लक्ष वेधले असून हे काम चुकीच्या पद्धतीने सुरु आहे असा आरोप निलेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना केला आहे. सरकारच्या अमृत योजनेतून बिल्डिंगच्या गटारांची ड्रेनेज लाईन जोडण्यात येणार होती. रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करतानाच ड्रेनेज लाईन जोडणे आवश्यक असताना मात्र त्याचे अपुऱ्या निधी अभावी योग्य नियोजन केले गेले नाही. मात्र या योजनेतील निधीचे काय झालं ? पुन्हा रस्त्यात पाण्याची लाईन, गटारांची ड्रेनेज लाईन याची वेगळी व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र आता तशी व्यवस्था नसल्याने पुन्हा जर ड्रेनेजचे काम करावे लागले तर रस्ता पुन्हा खोदावा लागेल. 'एमएमआरडीए' व पालिका प्रशासनाचे या कामाकडे लक्ष नाही. तर ठक्कर म्हणाले, या चुकीच्या कामाची दखल पालिका आयुक्तांनी त्वरित घेणे आवश्यक आहे असे निलेश म्हात्रे म्हणाले.
रस्त्यांचे काम सुरु असताना माहिती फलक लावणे बंधनकारक
महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार रस्त्याचे काम सुरु असताना माहिती फलक लावणे आवश्यक असते. रस्त्याच्या कामाचा कोणाला ठेका दिला आहे, किती निधी शासनाकडून या कामाकरिता देण्यात आला, हे काम सुरु होण्यापासून ते कुठल्या तारखेपर्यत पूर्ण होणार या कालावधीची सविस्तर माहिती फलकावर लिहिणे व तसा फलक लावणे हे बंधनकारक असते. जेणेकरून नागरिकांना याची माहिती मिळावी. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचे माहिती फलक लावले जात नाही.
अधिकाऱ्यांचे रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष
रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असताना पालिका अभियंताने प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक असते. मात्र गोग्रासवाडी येथे सुरु असलेल्या रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामाची पालिकेचे अभियंता आणि 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना केला आहे. तसेच चुकीच्या कामांमुळे जनतेचा पैसा वाया जात असल्याने येथील नागरिकांनीही सुरु असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा