BREAKING NEWS
latest

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलाच्या सतर्कतेमुळे फसला रक्तरंजित दरोड्याचा प्रयत्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कटाई दि.२३: कल्याण शीळ रोडवरील काटई येथील निळजे स्थित वैभव नगरी समोरील अर्जुन हाईट्स च्या दुसऱ्या मजल्यावर समाजसेवक गजानन पाटील आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहतात. गजानन पाटील एक सामाजीक कार्यकर्ता असून अनेक सामाजीक संस्था, संघटनांमध्ये निस्वार्थी भावनेने  कार्यरत आहेत. स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याबाबत शासन तसेच न्यायालयीन दरबारी ते सातत्याने पाठपुरावा करत असतात. त्यांचा मोठा मुलगा बारावीला असून लहान मुलगा आठवी इयत्तेत शिकतो. बारावीची परीक्षा तोंडावर असल्यामुळे तो रोज पहाटे ४ च्य सुमारास अभ्यासाच्या सरावासाठी उठून अभ्यास करीत असतो. नियमितपणे कालही पहाटेच्या सुमारास तो अभ्यासाच्या सरावासाठी उठून अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आंघोळ करण्यासाठी पहिल्यांदा बाथरूम मध्ये गेला आणि अर्ध्या तासाने आंघोळ करून आल्यानंतर त्याच्या रूम मधली खिडकी उघडी असून बाहेरील गाड्यांचा आवाज येत होता व कपाट उघडे असल्याचे त्याला आढळून आले. यावेळी त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले असता एक अज्ञात अनोळखी व्यक्ती खिडकीला लागूनच असलेल्या एका झाडाच्या सहाय्याने खाली उतरत असल्याचे व त्याच ठिकाणी त्याचे इतर चार ते पाच साथीदार त्याची वाट पाहत असल्याचे त्याला आढळून आले. पाटील यांच्या मुलाने त्या अनोळखी व्यक्तींना पाहिल्याचे समजल्यानंतर त्या पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी अंधारातून पळ काढला. मुलाने प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेली सर्व घटना श्री व सौ पाटील यांना सांगितली असता गजानन पाटील यांनी वेळ न दवडता लगेच सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एका अज्ञात व्यक्तीने दरोड्याचा उद्धेशाने घरात घुसलेला असून मुलगा बाथरूम मधून बाहेर आल्याची चाहूल लागताच आल्या दिशेने परत निघून गेल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून आले. लागलीच गजानन पाटील यांनी सकाळी ठीक नऊ वाजता मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार यांना घडलेली हकीकत सांगितली. ठाणे अंमलदार यांनी सांगितले की तुमच्याकडे पोलीस कर्मचारी  तपासाकरिता येतील आणि गुन्हा दाखल करतील. परंतु आज संध्याकाळ होऊन गेली तरीसुद्धा पाटील यांच्या घरी एकही पोलीस कर्मचारी तपासाकरिता आले नाही आणि गुन्हा दाखल केला गेला नाही असे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
सामाजीक कार्यामध्ये पाटील यांचा पुढाकार असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या करण्याचा हेतू या चोरट्यांकडून असू शकतो  तसेच या गुन्ह्यामध्ये काही अनोळखी पाच ते सहा साथीदार आढळून आल्यामुळे दरोडा घालून माझे व माझ्या कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा असू शकतो असे पाटील यांनी बोलून दाखविले. 
गजानन पाटील यांच्या राहत्या घरी झालेला हा प्रकार पहिल्यांदाच नसून मागील दोन वर्षांपूर्वी सुद्धा सशस्त्र दरोडा त्यांच्या घरी घातला गेला होता व लाखो रुपयांचा दागिन्यांचा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती. तसा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये (०६५९/२०२१) दाखल केला गेला असून तसाच आज सुद्धा रक्तरंजित दरोडा घालण्याचा प्रयत्न या अनोळखी व्यक्तींकडून झाला असता अशी भीती त्यांनी उपस्थित पत्रकारांसमोर व्यक्त केली. म्हणून पाटील यांनी सदरचा कायदेशीर गुन्हा नोंदवून या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या सर्व गुन्हेगारांना कडक शासन करावे अशी गजानन पाटील यांची कायदेशीर तक्रार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत