BREAKING NEWS
latest

'श्री छत्रपती शिवाजी महाराज' पारंपारिक क्रीडा महाकुंभ २६ जानेवारीपासून मुंबईत सुरू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  “गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ जोडुया भारतीय संस्कृतीशी नाळ” अशी घोषणा देत महाराष्ट्र सरकारचे मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय, मुंबई महानगरपालिका, क्रीडा भारती, मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील वेगवेगळ्या क्रीडांगणावर १६ वेगवेगळ्या खेळांचे आयोजन नामदार मंगलप्र भात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे. शिवकालीन पारंपरिक देशी खेळ, आपली भारतीय संस्कृती जपायला हवी. त्यासाठी सर्वांनी क्रीडा महाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही 
मंगलप्रभात लोढा यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कबड्डी, खो-खो, मल्लयुध्द, शरीर सौष्ठव, मल्लखांब, लंगडी, पंजा लढवणे, दंड बैठका, दोरीच्या उड्या, पावनखिंड दौड (मॅरेथॉन), फुगडी, ढोल ताशा स्पर्धा, लगोरी, विटी दांडू, लेझीम, रस्सीखेच, या १६ खेळांचा समावेश असणार आहे. ही स्पर्धा वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळ्या वयोगटात खेळवली जाणार आहे. ते गट पुढील वयोगटातून निवडले जाणार आहेत. १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील, १९ वर्षाखालील व खुल्या गटासाठी स्पर्धा असणार आहेत. मुले, मुली, पुरुष व महिला गटांसाठी ही स्पर्धा असणार असून शाळा महाविद्यालयातील सहभागी स्पर्धक खुल्या सहभागी स्पर्धकांबरोबर सुध्दा स्पर्धा करतील. स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी २० जानेवारी पर्यंत मुदत असून संबंधित खेळाच्या मुंबई शहर व मुंबई उपनगर संघटनांबरोबर संपर्क करून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून सहभागी होता येईल. याचबरोबर <www.mahakridakumbh.com> या वेबसाईटवर भेट देऊ शकता. संपूर्ण नोदणी आॅनलाईन पध्दतीने होणार आहे.       

आपल्या देशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडवणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभामध्ये १६ क्रीडा स्पर्धा आणि ४ क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिके आयोजित केले जाणार आहेत. या स्पर्धेत जवळजवळ १० ते १२ लाख तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. या स्पर्धेसाठी ८ जानेवारीपर्यंत १ लाख २५ हजार इतक्या खेळाडूंचे रजिस्ट्रेशन झाले असून, मोठा प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेतील पारितोषिक विजेते खेळाडू व संघांना रोख रक्कम २२ लाख ६२ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत