BREAKING NEWS
latest

सांस्कृतीक डोंबिवली नगरीत रोटरीतर्फे दर्जेदार ऑलिम्पिक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  दरवर्षी प्रमाणे डोंबिवली ऑलीम्पिकचे आयोजन 'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट' तर्फे १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रिजन्सी अनंतम ग्राऊंड, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन हे शनिवार १० फेब्रुवारी २०२४ रोजी रोटरी जिल्हा ३१४२ चे प्रांतपाल आणि प्रमुख पाहुणे मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. पूर्व प्रांतपाल डॉ. उल्हास कोल्हटकर  आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता प्रीती गाडे व सहाय्यक प्रांतपाल शैलेश गुप्ते हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ हा डोंबिवली रोटरी ऑलिम्पिकचे ध्वजारोहण  आणि राष्ट्रगीताने झाला. डॉन बॉस्को शाळेच्या अत्यंत सुरेल अशा दोन बँड पथकाच्या तालावर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा दिमाखदार पद मार्च सादर केला गेला. लजपत सरांनी पदमार्च चे सुरेख सूत्रसंचालन केले तर बारवे सरांनी सहभागी विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक ची शपथ दिली. या कार्यक्रमानंतर दावडी येथील छत्रपती शिवाजी मंडळाच्या उस्ताद व विद्यार्थी यांनी लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
'रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट' सातत्याने गेली ३२ वर्षे करत असणाऱ्या या डोंबिवली ऑलिम्पिक उपक्रमाचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्याचा कालावधी कमी करावा आणि मैदानावर जास्त उपस्थिती लावावी अशी विनंती त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना केली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इस्ट चे अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी रोटरी ऑलिम्पिक ची पार्श्वभूमी आणि रोटरी क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्प ह्याची माहिती दिली. सूत्रसंचालन रोटोरियन विनायक आगटे यांनी केले.
डोंबिवली ऑलिम्पिक मध्ये डोंबिवलीतील जवळजवळ ७० शाळांनी सहभाग घेतला होता. खो-खो, लंगडी, कबड्डी,  ऍथलेटिक्स, लांब उडी, गोळाफेक, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धात कल्याण-डोंबिवलीतील ३००० शालेय मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. डोंबिवलीकरांनी हजर राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. 'कबड्डी प्रो' चे निलेश शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावून या स्पर्धा संयोजनाबद्दल कौतुक केले आणि भविष्यातही रोटरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा चालू राहिल्या पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यात डोंबिवलीतील सहभागी शाळा, शिक्षक, परीक्षक विद्यार्थी, आणि डोंबिवलीकर क्रीडाप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यक्ष रघुनाथ लोटे, मानद सचिव डॉ. महेश पाटील, प्रकल्प प्रमुख रोटोरियन  सतीश अटकेकर व प्रकल्प संचालक रोटोरियन कमलाकर सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी २ दिवसाचे रोटरी ऑलिम्पिक यशस्वी होण्यासाठी घेतलेले परिश्रमन तसेच प्रयत्न उल्लेखनीय होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत