BREAKING NEWS
latest

रेडीओ च्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाधींनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी  यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांनी बुधवारी सकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अमीन सयानी यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या खास आवाजातील 'बहनों और भाईयो आप सुन रहे है..' ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. अमीन सयानी यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. 

अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या कार्यक्रमाने तेव्हाचे लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले होते. प्रत्येक आठवड्याला रेडिओप्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसले असायचे. अमीन सयानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस' मध्ये झाली होती. 

रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या 'गीतमाला' या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला १२ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्येच कामात असायचे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत