BREAKING NEWS
latest

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ११५६ कोटींचा निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर राज्यातील विकास कामांना गती मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल ११५६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची सुरुवात झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी डोंबिवली शहरात दोन विधी महाविद्यालये सुरू झाली असल्याची माहिती दिली. 

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांचे तसेच नव्याने रस्ता बांधणीसाठी आलेला निधी, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती देण्याबाबत आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, भिवंडी, मुरबाड, शहापूर, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, उल्हासनगर आदि भागात रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी देण्यात आला असून रस्ते सुस्थितीत राहावेत व दर्जेदार कामे व्हावी त्याकडे शासनाचा भर असल्याचे देखील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मराठी माध्यमाच्या शाळांबाबत देखील शासनाकडून सकारात्मक पावले उचलले जात असल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

डोंबिवलीतील दोन महाविद्यालयात 'लॉ कॉलेज' साठी परवानगी

या पत्रकार परिषदेत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली परिसरात 'लॉ कॉलेज'ची मागणी होत होती या पार्श्वभूमीवर 'जोंधळे कॉलेज' व 'जोशी हायस्कूल' या दोन ठिकाणी 'लॉ कॉलेज' साठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. शहरात लॉ कॉलेज नसल्याने अनेक जणांना उल्हासनगर, मुंबईच्या दिशेने शिक्षणासाठी जावं लागत होतं आता ही व्यवस्था शहरात झाल्याने शहरातील विद्यार्थ्यांना लाभ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक कोणी लढवावी हा निर्णय दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्ड घेतील. राज्यातील निर्णय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार  घेतील. ती यादी गेल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल असे सांगितले.

मराठा समाजाला सरकारतर्फे मिळणार न्याय

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष अधिवेशन घेऊ असे सांगितले. यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, उद्या मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम सरकार ठामपणे करेल.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत