कल्याण दि.२९ : शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा वाहतूक पोलीस लक्ष होत असतात अथवा त्यांच्यावर टीका देखील केली जाते. मात्र कल्याण मध्ये वाहतूक पोलीसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला रेल्वे स्टेशन परिसरात आपल्या राहिलेल्या बॅगेतील तीस हजारांची रोकड आणि चांदीचे दागिने परत मिळाले आहेत. हा ऐवज कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वारिष्ट पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी या कुटुंबाला परत करत आपल्या वाहतूक पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात राहणारे लक्ष्मीबाबू गुप्ता हे उत्तर प्रदेशातील बलिया येथून ट्रेनने येत आज सकाळी १० वाजता कल्याण स्टेशनला उतरले. यावेळी त्यांच्याकडे सुमारे ८ बॅगा असल्याने गडबडीत एक बॅग स्टेशन परिसरातील सरकत्या जिन्याजवळ राहिली. याठिकाणी एक बेवारस बॅग राहिल्याची माहिती तिथे असलेल्या वाहतूक
पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच वाहतूक पोलीस पाटील आणि चव्हाण वाहतूक वॉर्डन त्याठिकाणी गेले. बॅग बेवारस असल्याने भीतीचे वातावरण होते. कारण अलीकडे अश्याच एका बेवारस बॅगेत जिलेटीन स्फोटके सापडली होती. पोलीसांनी मोठ्या धैर्याने आणि हिम्मतीने बॅग उघडून पाहिली असता, त्यात नवीन कपडे आणि एक छोटी पर्स होती. त्यात तीस हजार रुपये रोख आणि चांदीच्या वस्तु होत्या.
यानंतर पोलीसांनी आजूबाजूला विचारपुस करून बॅग कोणाची आहे याबाबत माहिती काढली. संबंधितांना बोलवून बॅग त्यांची असल्याची खात्री केल्यानंतर बॅग गुप्ता कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. तर स्टेशन परिसरात राहिलेली बॅग पोलीसांनी परत केल्याने लक्ष्मीबाबू गुप्ता यांनी वाहतूक पोलीसांचे आभार मानले. एकूणच वाहतूक पोलीसांच्या या कामगिरी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा