BREAKING NEWS
latest

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण मधील स्मारक सर्वाना एक प्रेरणा आणि ऊर्जा देत राहिल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
कल्याण दि.११ : कल्याण मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सर्वाना एक प्रेरणा आणि ऊर्जा देत राहिल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केले. महाराष्ट्र शासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र स्मारक समिती आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात (ड/प्रभागक्षेत्र) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे अनावरण करते वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे प्रतिपादन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (सामाजिक न्याय व सक्षमीकरण) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड व इतर अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या जडणघडणीत दिलेले योगदान अभुतपूर्व आहे. त्यांनी सामाजिक क्रांतीचा, परिवर्तनाचा वारसा आपल्याला दिला आहे. तो वारसा घेवूनच आपले सरकार काम करीत आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक आर्थिक हक्क, स्त्री पुरूष समानता, समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षणाची विकासाची संधी ही सामाजिक न्यायाची तत्वे आहेत आणि हाच आपल्या राज्यकारभाराचा पाया आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे, त्यांनी लोक कल्याणकारी काम केले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही आणली असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारच्या माध्यमातून स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण सर्व जनमानसांपर्यंत पोहचली पाहिजे, बाबासाहेबांच्या संविधानातील भारत हा आपल्या सर्वांचा आहे, असे सांगत आपल्या खुमासदार शेरोशायरीने केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय व सक्षमीकरण) रामदास आठवले यांनी उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कल्याण मधील स्मारक हे आपल्या सर्वांच्या मेहनतीतुन, सगळयांच्या सहकार्यातुन उभे राहिले आहे, हे केवळ पुतळयाचे अनावरण नव्हे तर बाबासाहेबांचे चरित्र सर्वांसमोर ठेवीत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे स्वप्न आज साकार झाले त्यात खारीचा वाटा मी उचलला याचा मला अभिमान आहे,असे उद्गार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना काढले. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामुळे कल्याण मधील नव्हेच, तर आजुबाजूच्या परिसरातील नागरीकांसाठी या स्मारकाच्या स्वरुपात एक जिव्हाळयाचे श्रध्दास्थान उपलब्ध होणार आहे. स्मारकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली तैलचित्रे, विविध प्रकारची म्युरल्स, वाचनालय इ. सुविधांमुळे नागरीकांना आपल्या कुटूंबियासमवेत या स्मारकास भेट देवून चालत्या बोलत्या ज्ञान विद्यापीठात येवून ज्ञानार्जन करता येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी आपल्या भाषणात काढले.
कार्यक्रमाच्या अखेरीस भंते आनंद महाथेरो यांच्याकडून सामुहिक बुध्दवंदना झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणाली‌मार्फत, रिमोटद्वारे बटण दाबुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण संपन्न झाले. या स्मारकाच्या ठिकाणी प्रदर्शन हॉल, प्रशासकीय दालन, कन्सेप्ट थीम, होलोग्राफी शो, वाचनालय, उदवाहन, प्रसाधनगृह इ.सुविधा असून पहिल्या मजल्यावर सुमारे ८ फूट उंचीचा सुशोभित चौथरा बांधुन त्यावर १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून, त्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली आहे. याठिकाणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रक्षेपण, थीम व्यवस्था, वाचनालय होलोग्राफी शो, तैलचित्रे व म्युरल्स इ. सोईसुविधा विविध कक्षात निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

या कामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधांचा विकास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकासयोजना आणि महापालिका निधीतून खर्च करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव व उद्यान अधिक्षक महेश देशपांडे यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत