BREAKING NEWS
latest

होळी सणासाठी ठाणे जिल्ह्यातून १२६ जादा गाड्या सोडणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : शिमग्याला चाकरमानी हे हमखास आपल्या गावी होळीसाठी जात असतात. त्यामुळे नेहमीच मुंबई - ठाण्यातील चाकरमान्यांना सुखरूप या सणांना आपल्या गावी नेऊन सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभाग दरवर्षीप्रमाणे यंदा ही सज्ज झाले आहे. यावेळी तब्बल १२६ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये आरक्षणाच्या १०६ तर ग्रुपच्या २० गाड्यांचा समावेश आहे. तर यंदा १२ गाड्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे-२ या एकाच आगारातून सर्वाधिक ३९ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या २२ ते २६ मार्च दरम्यान  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गाड्यांचे नियोजन असून चाकरमान्यांनी गावी जाताना आपले तिकीटाचे आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा, असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

येत्या २४ मार्चला होळी आणि २५ मार्चला धुळवड असून त्यामुळे कोकणात होळीला जाणाऱ्यांची लगबग लक्षात घेत एसटीच्या ठाणे विभागाने चांगलीच कंबर कसली असून येत्या २२ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. तर २३, २४, २५ आणि २६ मार्च रोजी जास्त गाड्या सोडण्यावर भर दिला आहे. त्या आठवड्यात ठाणे - १ आगारातून २९, ठाणे - २ आगारातून ३९, कल्याण आगारातून २३ आणि विठ्ठल वाडी आगारातून ३१ अशा १२२ गाड्या सोडण्यात येणार असून या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. चाकरमान्यांनी होळी सणाला आपल्या गावी जाण्यासाठी डेपोतील खिडकी तसेच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सांगितले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत