BREAKING NEWS
latest

निवडणूक आयोगातर्फे कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
डोंबिवली दि.१९ : निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या असुन १८ व्या लोकसभेसाठी १८ एप्रिल ते १ जूनपर्यंत निवडणुका होणार आहेत.‌ कल्याण लोकसभा मतदार संघात २० मे रोजी निवडणुका होणार आहे अशी माहिती कल्याण लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय कार्यकारी अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी विश्वास गुजर देखील उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदार संघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली, कळवा, मुंब्रा असे सहा मतदार संघ आहेत. यामध्ये २०,१८,९५८ मतदार असून यामध्ये १०,८५,७१० पुरुष,  ९,३२,५१० महिला, ७३८ तृतीयपंथी, १०,८०२ दीव्यांग, १८,१७९ मतदार ८५ वर्षांवरील असून नवमतदार २२,१७९ असे मिळून आहेत. यावर्षी ३,११,६९४  युवा मतदार पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कल्याण लोकसभा क्षेत्रात मतदान सोयीस्करपणे पार पाडण्याकरिता २००० मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आलेली आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी यावे असे आवाहन निवडणूक निर्णय कार्यकारी अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५ टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यामुळे यंदा ७५ टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे. टक्केवारी वाढावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. 

निवडणूक कार्यक्रम :

निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक. २६ एप्रिल, २०२४ (शुक्रवार)

नाम निर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक. ०३ मे, २०२४ (शुक्रवार)

नाम निर्देशन पत्रांची छाननी दिनांक. ०४ मे, २०२४ (शनिवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक. ०६ मे, २०२४ (सोमवार)

मतदानाचा दिनांक. २० मे, २०२४ (सोमवार)

मतमोजणीचा दिनांक. ०४ जून, २०२४ (मंगळवार)

८५ वयोगटावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सि-व्हीजील ऍप द्वारे  निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता आढळल्यास या ऍपद्वारे संदेश शेअर करू शकतात.

नामनिर्देशित पत्र दाखल करणे, पत्रछाननी, नामनिर्देश पत्र मागे घेणे चिन्हवाटप इत्यादी बाबतची कार्यवाही सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे.

मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराला ७५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. ६० भरारी पथकं, निवडणूक पथकं नेमण्यात आलेली आहेत. २३ एप्रिल पर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांना मतदान यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. ज्या युवा नागरिकांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार असलेल्यांना पण आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत