BREAKING NEWS
latest

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटीचे सावट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भात. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. असाच लहरीपणा गेल्यावर्षी देखील पाहायला मिळाला. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस झाला नाही. परंतु पावसाळा संपल्यानंतर मान्सूनोत्तर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात त्राहीमाम माजवला. या चालू वर्षातही तशीच परिस्थिती असून अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे आणि गारपीटीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात वादळी पावसाची हजेरी लागली आहे. तर विदर्भ विभागातील काही भागात गारपीट झाल्याची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की अजूनही अवकाळी पावसाचे सावट दूर झालेले नाही. हवामान खात्याने आगामी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे. आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे बरसणार अवकाळी पाऊस

सध्या राज्यातील काही भागात रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन मुख्य पिकांची मराठवाडा आणि विदर्भ विभागात हार्वेस्टिंग सुरू आहे. पण, मराठवाडा आणि विदर्भातच अवकाळी पाऊस होणार असा अंदाज आहे.

आज अर्थातच १९ मार्च २०२४ ला भारतीय हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भ विभागातील जवळपास १५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा इशारा कायम आहे. पण, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका जाणवणार अशी शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील काही भागात पावसाचे सावट पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे. यामुळे राज्यात संमिश्र वातावरणाची अनुभूती होतेय.

कुठे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत जात आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.आज देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. आयएमडीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार सध्या विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

हेच कारण आहे की, दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. दरम्यान याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळतंय. दरम्यान, आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ४ जिल्ह्यात वादळी पाऊस अन गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. शिवाय बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर या ११ जिल्ह्यात देखील आज वादळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत