BREAKING NEWS
latest

शिंदे सेना सोडून आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होत डॉ. अमोल कोल्हें विरूद्ध लढणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे :  शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी ठरल्याप्रमाणे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना शिंदे गटाचे नेते असलेले आढळराव उमेदवारीसाठी अजित पवार गटात आले असले तरी या प्रवेशापाठीमागे महायुतीत मोठ्या हालचाली झालेल्या आहेत.

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे अजित पवार यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. आता शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे येथे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विरूद्ध अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत रंगणार. 

शिरूर मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा तोच सामना होणार असला तरी आता पक्ष बदलले आहेत. आढळराव शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढणार आहेत, तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढतील.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटातील प्रवेश हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. एकुणच शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार ठरवताना पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या असल्याची चर्चा आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत