डोंबिवली दि.०२ : आकाशाला गवसणी घालण्याची कल्पनाशक्ती ही सर्वांकडेच असते, परंतु त्या कल्पनाशक्तीला जोड हवी ती प्रयत्नांची, जिद्दीची, सत्याची आणि आत्मविश्वासची. या सर्व गुणांचे मिश्रण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे. अगणित पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. कोल्हे यांना ह्या वर्षी २०२४ चा "टॉप १०० ग्लोबल एड्युलीडर्स" चा पुरस्कार दिनांक ३० मार्च २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला. तोच पुरस्कार प्रत्यक्ष रित्या देण्यासाठी मधुबन वातानुकुलीत दालनात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालात अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, जान्हवी कोल्हे यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे 'एमसी स्टेम' एज्युकेशन चे अध्यक्ष डॉ. कुमार दत्त गांजरे तसेच बांदोडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मोझेस यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. त्याचबरोबर जन गण मन शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, व विद्यार्थी देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाली तर अवंतिका राणे (इयत्ता ९ वी) हीने स्वागत नृत्य करून पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला राव यांनी डॉ. राजकुमार कोल्हे यांचा थोडक्यात परिचय दिला व उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मोजक्या शब्दात प्रमुख पाहुण्यांनी सुंदर भाषण दिले. 'जे एम एफ' संस्थेत २००८ सालापासून ते आतापर्यंत कार्यरत असलेले शिक्षक यांनी शाळेविषयी व अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्याविषयीच्या जुन्या आठवणी आणि अनुभव दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे यांनी बनवलेल्या माहितीपट माध्यमातून व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुण्यांचा हस्ते डॉ. राजकुमार कोल्हे यांना "टॉप १०० ग्लोबल एड्युलीडर्स" चे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून गेला. त्याच वेळेला सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि अभिमानाची झालर पसरली.
हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण 'जे एम एफ' संस्थेच्या परिवाराचा आहे. प्रत्येक पुरस्काराच्या कौतुकाची थाप ही प्रत्येकवेळी वेगळी असते आणि तो स्वीकारण्याचा अनुभव आणि आनंद हा गगनात मावेनासा असतो, असे भावात्मक उद्गार डॉ. कोल्हे यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले. प्रत्येक नवीन पुरस्कार हा आपल्याला अजुन नवीन कार्य करण्याची उमेद तसेच ऊर्जा देऊन जातो आणि पुन्हा आपण नव्या ऊर्जेने जोमाने त्या कार्यासाठी स्वतःला झोकून देतो असे सांगून डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता इंजापुरी व संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी केले. समन्वयक ममता राय यांनी आभारप्रदर्शन केले व वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा