BREAKING NEWS
latest

कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांची आयोगाकडे फेर निवडणुकीची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : राज्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा सातत्याने चर्चेत येत असतो. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अनेक महिन्यांपासून हा मतदारसंघ वारंवार चर्चेत येत होता. या मतदारसंघात गेल्या १० वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. श्रीकांत शिंदे खासदार असताना या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात होता. या मतदारसंघात मधल्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच शितयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना अंतर्गत मतभेदांवर मार्ग काढावा लागला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. आता या निवडणुकीत कोण जिंकतं ते येत्या ४ जूनला स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी या मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे  फेर निवडणुकीची मागणी केली आहे.

फेर निवडणुकीची मागणी कुणी आणि का केली ?

कल्याण लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. या मतदारसंघात नुकतंच लोकसभेचं मतदान पार पडलं. पण अनेक मतदारांचे नाव मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे मतदानापासून अशाप्रकारे वंचित राहणाऱ्या मतदारांचा आकडा हा तब्बल ८० हजाराच्या वर इतका असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक व्हावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे  केली आहे. यासाठी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाला आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील दिला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदार यादीतून ८० हजाराच्या वर मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे मतदानापासून ८० हजार मतदार वंचित राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर निवडणुकीचा निर्णय घ्यावा. "फेर निवडणूकीचा निर्णय न झाल्यास २७ मे पासून आमरण उपोषणाला बसणार", अशी भूमिका अभिजीत बिचुकले यांनी मांडली आहे. अभिजीत बिचुकले यांच्या मागणीत काहीसं तथ्य असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कारण तब्बल ८० हजाराच्या वर  मतदारांना मतदान करता आलेलं नाही, असा दावा केला जातोय. या प्रकरणी निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात किती टक्के - मतदान ?

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी  ५०.१२ टक्के मतदान झाल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण ५०.१२ टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण ५२.१९ टक्के, महिला मतदारांचे प्रमाण ४७.७५ टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण २१.६३ टक्के इतके आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत