BREAKING NEWS
latest

केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर वधारले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नाशिक : केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे यामुळे सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात काल पेक्षा आजच्या कांद्याच्या सरासरी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. तसेच ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे. यामुळे कांद्याची निर्यात करणं शक्य होणार असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.

७ डिसेंबर २०२३ ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला होता. त्यानंतर एनसीईएल च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती. मात्र अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नवीन निर्णय घेतला असून याचे निर्यातदारांनी स्वागत केले आहे.

या पार्श्वभूमीवर लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी २ हजार ३० रुपये भाव मिळत आहे. तर जास्तीत जास्त २ हजार ५५१ भाव मिळतोय. कालच्या आणि आजच्या दरात सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे नोटीफिकेशन निघाल्यानंतर कांद्याचा दरात सुधारणा झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की, काहीही करा आणि कांदा निर्यात खुली करा. या निर्णयामुळे कांद्याला चांगला भाव मिळेल, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य ५५० प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती
पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत