सातारा - राज्यातील उकाड्यासह लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि महायुतीमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. महायुतीमध्ये आता मनसे देखील सामील झाली आहे. राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले असे म्हणत जयंत पाटील यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाचा प्रचार आज थंडावणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यामध्ये सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट वेगाने चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपल्या १० ते १५ तरी जागा निवडून येतात का? भाजपचेच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं” अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी महायुतीवर केली आहे.
साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला होता. जयंत पाटलांनी साताऱ्यामध्येच फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. जय़ंत पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो. तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. उदयनराजे यांना मी सल्ला दिला असता उभे राहू नका. आधी शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही, “अशा शब्दांत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा