BREAKING NEWS
latest

उमेदवारांच्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची कल्याण मध्ये महाविजय संकल्प सभा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१५ : कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे व भिवंडी लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील 'व्हर्टेक्स छत्रपती शिवाजी महाराज मैदान' येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट महाविजय संकल्प सभा झाली. कल्याण मधील दुर्गादेवी, तिसाई आणि अंबरनाथच्या महादेवाला प्रणाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषण सुरू करून सभेला उपस्थित असणाऱ्या लाखो नागरिकांची मने जिंकली.
लाखोंच्या या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. इंडी आघाडीकडून हिंदू-मुस्लिम असा खेळ केला जात आहे. मोदींकडून हिंदू-मुस्लिम वाद केला जात असल्याचा आरोप केला जातो. पण मोदी हा खेळ खेळणाऱ्यांचा 'कच्चा चिठ्ठा खोल रहा है,' असे बोलत नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसला एकप्रकारे आव्हानचं दिले. आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही काँग्रेसवाले अल्बम उघडून पाहतात, अशी काँग्रेसची स्थिती आहे, असा मिश्किल टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारला.
मोदी यांनी या सभेला संबोधित करताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटावर आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच मोदी म्हणाले, काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) वीर सावरकरांचा आपमान करतात, मंचावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करतात आणि सावरकरांचं, शिवाजी महाराजांचं नाव घेणारी नकली शिवसेना मात्र  शांत बसते. आम्ही टीका केल्यानंतर नकली शिवसेना आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांनी काँग्रेसच्या युवराजाला समजावलं की या निवडणुकीत सावरकरांबद्दल काही बोलू नका. तेव्हापासून युवराज सावरकरांबद्दल काही बोलत नाहीत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारे लोकं आता काँग्रेसचा कुर्ता पकडून उभे आहेत. हा काँग्रेस पक्ष नेहमीच फुटीरतावाद्यांचं, दहशतवाद्यांचं समर्थन करत आला आहे. आता नकली शिवसेना त्यांच्याबरोबर उभी आहे. हे काँग्रेसवाले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि नकली शिवसेना स्वस्थ बसते. तुम्ही काँग्रेसच्या राजकुमाराचा तो व्हिडीओ पाहिला असेलचं. काँग्रेसचा राजकुमार मंचावर उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिरस्कार करत होता. ते चित्र पाहून महाराष्ट्राला आणि येथील जनतेला काँग्रेसच्या त्या युवराजाचा खूप राग आला. पण नकली शिवसेनावाले लोकं मात्र त्यावेळी तोंडाला कुलूप लावून आणि डोळ्याला पट्टी बांधून बसली होती. काँग्रेसवाले वीर सावरकरांचा अपमान करतात मात्र नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत ??
पंतप्रधान मोदी म्हणाले की राष्ट्रकल्याणासाठी मी इथे कल्याणकरांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार 'भारत' आज नव्या जोमाने 'विकास' करत आहे. हाच विकास रथ पुढे नेण्यासाठी तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि भिवंडी मतदार संघातून कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा. विकसित आणि सशक्त भारत करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना केले. पंतप्रधान महोदयांची आज कल्याण येथे विराट अशी जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना विकसित भारताचा संकल्प सोडला. या प्रसंगी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती आणि आदिवासी समाजाचे प्रतिक असलेले वारली चित्राची सुंदर अशी प्रतिमा देखील भेट म्हणून दिली. 
"तुमची स्वप्ने हा मोदीजींचा संकल्प आहे आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले क्षण तुमच्यासाठी समर्पित करतो" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेमध्ये बोलताना म्हणाले. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, मनसे आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रकाश भोईर, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, सुलभा गायकवाड आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत